अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन हे इंडस्ट्रीतील सर्वात सर्वाधिक चर्चेत असणारं जोडपं आहे. दोघांची त्यांच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चा होते. ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला आहे, ते वेगळे झाले आहे, हे त्यांच्याबद्दल बरेचदा बोललं जातं. आता अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या अफवांवर स्पष्ट उत्तर दिलं आहे.

ऐश्वर्या राय कोणताही इव्हेंट वा एअरपोर्टवर मुलगी आराध्याबरोबर दिसते. अभिषेक बच्चन त्यांच्याबरोबर नसतो. एकदा तर अवॉर्ड सोहळ्यातही ऐश्वर्याबरोबर आराध्याच होती. तसेच कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याला दुखापत झाली होती, तेव्हाही आराध्याच आईला मदत करताना दिसली होती. त्यानंतर ऐश्वर्या व अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या चर्चांवर अभिषेक बच्चनने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चन म्हणाला…

घटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चन म्हणाला, “हा सगळा फालतूपणा आहे. तिला माझं सत्य माहितीये, मला तिचं सत्य माहित आहे. आम्ही एकत्र खूप आनंदी आहोत आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी माझं कुटुंब निरोगी आणि आनंदी असणंच महत्त्वाचं आहे.”

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक बच्चन आई जया बच्चन, वडील अमिताभ बच्चन, बहीण श्वेता बच्चन नंदाबरोबर आला होता. तर काही वेळाने ऐश्वर्या राय मुलीबरोबर आली होती. ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाबरोबर न आल्याने अभिषेक व तिच्या नात्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर जवळपास वर्षभर याच चर्चा होत होत्या. पण नंतर एका लग्नाला अभिषेक व ऐश्वर्याने एकत्र हजेरी लावली. अभिषेकने पत्नी ऐश्वर्या राय व सासू वृंदा राय यांच्याबरोबर फोटो काढले. त्यानंतर या दोघांच्या नात्याबद्दलच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मैत्री ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली आणि २००६ मध्ये ‘उमराव जान’ आणि ‘धूम’ या चित्रपटांदरम्यान ते प्रेमात पडले. अभिषेकने ‘गुरु’ च्या सेटवर ऐश्वर्याला खोटी अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. त्यानंतर २००७ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना २०११ मध्ये मुलगी झाली. तिचं नाव आराध्या. ऐश्वर्या व अभिषेक यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत.