Abhishek Bachchan on daughter Aaradhya: कलाकारांबरोबरच त्यांच्या घरातील सदस्य विशेषत: त्यांची मुले मोठ्या चर्चेत असतात. आलिया भट्ट-रणबीर कपूर यांची लेक राहा, सैफ अली खान-करिना कपूर यांची मुले जेह आणि तैमूर यांच्यापासून अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायची मुलगी आराध्यापर्यंत सर्व कलाकारांच्या मुलांची विविध कारणांमुळे चर्चा होते.

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांची मुलगी आराध्या बच्चन ही नेहमी तिच्या आईबरोबर विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. आता अभिषेकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लेकीबाबत वक्तव्य केले आहे.

अभिषेक बच्चनने नुकतीच नयनदीप रक्षितला मुलाखत दिली. या मुलाखतीत आराध्यावर जे संस्कार आहेत, तिला ज्या पद्धतीने वाढवले गेले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय त्याने ऐश्वर्याला दिले. अभिनेता म्हणाला, “आराध्याला वाढवण्याचे संपूर्ण श्रेय ऐश्वर्याचे आहे. मी बाहेर जातो, काम करतो, चित्रपट बनवतो. मला स्वातंत्र्य मिळते याचे श्रेय ऐश्वर्याचे आहे. ती आराध्याची काळजी घेते. ती अद्भूत आहे. निःस्वार्थी आहे. मला याचे आश्चर्य वाटते.

वडील आपल्या मुलांसाठी इतकं सर्व करू शकतात असे मला वाटत नाही, ते कामाला प्राधान्य देतात. माझी मुलं माझे प्राधान्य आहे, असे फक्त आईच म्हणू शकते. हे खूप सुंदर आहे. त्यामुळेच आपण आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपल्या आईकडे जात असतो. त्यामुळे आराध्यासाठी ऐश्वर्याने खूप काही केले आहे. आराध्याला इतक्या उत्तम पद्धतीने वाढविण्याचे श्रेय ऐश्वर्याचे आहे.”

पुढे लेकीचे कौतुक करत अभिनेता म्हणाला, “ती सोशल मीडिया वापरत नाही. इतकेच काय तिच्याकडे तिचा स्वत:चा फोनदेखील नाही. मला वाटते की ती एक अतिशय कर्तव्यदक्ष मुलगी म्हणून वाढली आहे. हे तिचे स्वत:चे काही गुण आहेत. ती आमच्या घराचा अभिमान आहे. ती आमच्या घराचा आनंद आहे, त्यामुळे आमच्यावर देवाची कृपा आहे. माणूस शेवटी त्याच्या आनंदी कुटुंबासाठी घरी परतत असतो, हे खूप गरजेचेच आहे.” अभिषेकने असेही सांगितले की, सध्या आराध्या ऐश्वर्यापेक्षाही उंच झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचे तर तो नुकताच ‘कालिधर लापता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ४ जुलै २०२५ ला हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. याआधी हाऊसफुल ५ मध्येदेखील अभिषेक महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. याबरोबरच, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या व ऐश्वर्याच्या घटस्फोटाबद्दल ज्या अफवा पसरल्या होत्या, त्यावर त्याने संताप व्यक्त केला.