Abhishek Bachchan And Farida Jalal Video Viral: सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल होतात. चाहते त्यावर कमेंट्समधून त्यांची मते व्यक्त करीत असतात. सोशल मीडियावर कलाकारांचे कौतुकही केले जाते आणि ट्रोलिंगदेखील मोठ्या प्रमाणात होते.
सध्या अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची चर्चा खूपच रंगली आहे. तसेच, अभिषेकच्या वागण्याबद्दलही चाहते कमेंट्स करीत असल्याचे दिसत आहे.
अभिषेक बच्चनचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल भयानीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अभिषेक बच्चन, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल, अभिनेत्री शबाना आझमी हे एकत्र दिसत आहेत. ७७ वर्षीय फरीदा जलाल यांना चालण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची गरज असल्याचे पाहायला मिळते. त्यावेळी अभिषेक बच्चन त्यांना मदत करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तो त्यांचा हात हातात धरतो, तसेच त्यांना गाडीपर्यंत पोहोचवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अभिषेक बच्चनने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत; तर फरीदा जलाल यांनी सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्याबरोबरच शबाना आझमींनी सुंदर साडी नेसली आहे. मुंबईतील एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने हे कलाकार एकत्र दिसले.
आता या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत अभिषेकचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “किती गोड”, एका नेटकऱ्याने लिहिले, “तो खरा जेंटलमन आहे”, एकाने लिहिले, “सगळ्यांची आवडती आजी”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “अभिषेक बच्चन तू मला खूप आवडतोस. तू खूप चांगला व्यक्ती आहेस. फरीदाजी खूप सुंदर दिसत आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

फरीदा जलाल यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. फक्त चित्रपटच नाही, तर त्यांनी मालिकांमध्येदेखील काम केले. त्यामध्ये त्यांनी साकारलेल्या पात्रांची आजही चर्चा होताना दिसते. २००३ ला प्रदर्शित झालेली शरारत ही मालिका चांगलीच गाजली होती.
त्याबरोबरच कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, तकदीर, मजबूर, लाडला, बॉबी, क्या कहना, दिल तो पागल है अशा अनेक चित्रपटांत फरीदाजी यांनी काम केले आहे. नुकतीच त्यांनी ओ रोमिओ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
दरम्यान, अभिषेक बच्चन लवकरच द किंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुख खान, अर्शद वारसी, सुहाना खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
