२००५ मध्ये, म्हणजेच दोन दशकांहून अधिक काळापूर्वी, अमिताभ बच्चन यांनी शाद अली दिग्दर्शित ‘बंटी और बबली’ चित्रपटात मुलगा अभिषेक बच्चनबरोबर स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील ‘कजरा रे’ या लोकप्रिय गाण्यात अभिषेकसह अभिनेत्री ऐश्वर्या रायही झळकली होती. त्यानंतर दोन वर्षांनी ऐश्वर्याने अभिषेकबरोबर लग्न केलं आणि ती बच्चन कुटुंबाचा भाग झाली.
आज २१ वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिषेकने ‘कजरा रे’च्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला. तिघांनी मिळून या गाण्याचा रिमेक करावं का, असं विचारलं असता अभिषेकने आपण त्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. मात्र, वडील अमिताभ बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या रायही त्यासाठी तयार असतील की नाही, याबाबत त्याने काही सांगितलं नाही.
अभिषेकने सांगितली आठवण
‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक ‘कजरा रे’च्या शूटिंगच्या आठवणी सांगताना म्हणाला, “कजरा रे इतकी एखाद्या दसुऱ्या गाण्याचं शूटिंग करताना मला यापेक्षा जास्त मजा आली आहे असं वाटत नाही. तो एक मोठा आनंदाचा सोहळाच होता. आम्ही खूप मजा केली. मला अजूनही आठवतंय, आम्ही शूटिंग करत होतो आणि त्याच दिवशी माझा वाढदिवस होता. त्यांनी माझा वाढदिवसही साजरा केला.”
अभिषेकने सांगितलं की, चित्रपटाचे दिग्दर्शक शाद अली यांनी हे गाणं अनेक तास वाजवलं आणि सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने डान्स करायला सुरुवात केली. शाद यांनी या क्षणांचं शूटिंग केलं आणि नंतर त्यातील काही दृश्यं गाण्यात वापरली. “मुळात शाद यांनी काय केलं, तर त्यांनी गाणं लावलं आणि जवळपास चार तास आम्ही फक्त डान्स पार्टी केली. त्यांनी त्यातील बरंच काही शूट केलं आणि सेटवर आम्ही मजा करताना, मनसोक्त एन्जॉय करताना शूट केलेले काही शॉट्स गाण्यात वापरले. हे गाणं कल्ट ठरलं आहे. मला ते खूप आवडतं. त्याचं शूटिंग करताना मला खूप मजा आली. त्या खूप चांगल्या आठवणी आहेत, खूप मजा आली,” असं अभिषेकने सांगितलं.
‘कजरा रे’ या गाण्याचं २.० व्हर्जन करण्यास इच्छुक आहेस का, असं विचारलं असता अभिषेकने “मला नक्कीच आवडेल” असं म्हटलं. तो पुढे म्हणाला, “मी त्यासाठी तयार आहे. मला नक्कीच आवडेल. मात्र, त्यासाठी तुम्हाला ऐश्वर्या आणि माझ्या वडिलांनाही तयार करावं लागेल.” ‘बंटी और बबली’मध्ये अभिषेकने राणी मुखर्जीबरोबर महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती, तर अमिताभ बच्चन यांनी त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसाची भूमिका केली होती. चित्रपटाच्या शेवटी अमिताभ आणि अभिषेकच्या व्यक्तिरेखा एकमेकांसमोर येतात. या चित्रपटातील ‘कजरा रे’ या गाण्यात ऐश्वर्या रायने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अलिशा चिनॉय, शंकर महादेवन आणि जावेद अली यांनी आवाज दिला आहे. या गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंट यांनी केली होती.
