Aishwarya Rai-Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपे आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्यांचा चाहतावर्ग आहे. ऐश्वर्या व अभिषेक यांनी २० एप्रिल २००७ ला लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगी आहे. २०११ ला तिचा जन्म झाला. ऐश्वर्या व अभिषेकच्या मुलीचे नाव आराध्या असे आहे.

आज (२० एप्रिल) ऐश्वर्या व अभिषेकच्या लग्नाला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्यावर चाहत्यांकडून तसेच कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे. तसेच, अभिषेकच्या एका वक्तव्याची चर्चादेखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

“लग्नसंस्थेवर आम्हा दोघांचाही विश्वास…”

२०२१ ला अभिषेक बच्चनने रणवीर अलाहाबादियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो म्हणालेला, “जेव्हा मी प्रोडक्शन विभागात काम करत होतो, त्यावेळी पहिल्यांदा ऐश्वर्याला भेटलो होतो. माझे वडील मृत्यूदाता या सिनेमात काम करत होते. त्या सिनेमाचे शूटिंग स्वित्झर्लंडमध्ये सुरू होते. ते लोकेशन पाहण्यासाठी मी तिथे गेलो होतो. काही दिवस मी तिथे थांबलो, तिथेच माझा लहानपणीचा मित्र बॉबी देओल त्याच्या पहिल्या चित्रपटाचे और प्यार हो गया या सिनेमाचे शूटिंग करत होता. त्याला जेव्हा समजले की मी तिथे आहे, तेव्हा त्याने मला जेवणासाठी बोलावले. त्यावेळी पहिल्यांदा मी ऐश्वर्याला भेटलो. ऐश्वर्या मला सांगते की, त्यावेळी माझ्या ब्रिटिश बोर्डिंग स्कूलच्या उच्चारामुळे तिला मी बोललेला एक शब्दही कळला नाही.”

२०१० ला कॉफी विथ करण या कार्यक्रमात ऐश्वर्याने हजेरी लावली होती. यावेळी तिने अभिषेकबरोबरच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले होते. ती म्हणालेली, “लग्न म्हणजे विश्वास ठेवणे आणि तो टिकवून ठेवणे. लग्नसंस्थेवर आम्हा दोघांचाही विश्वास आहे. कदाचित म्हणूनच आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्हाला एकमेकांबद्दल जिव्हाळा, आपलेपणा वाटला. जेव्हा आम्ही एकत्र आलो, आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्ही एका वर्षाच्या आतच लग्न केले. इतक्यात लग्न करणार नाही, मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे, या विचाराशी मी सहमत नाही.”

२००९ ला ऐश्वर्या व अभिषेकने हिंदूस्तान टाईम्सला मुलाखत दिली होती. यावेळी ऐश्वर्या म्हणालेली, “अभिषेक माझ्या आई-वडिलांचा लाडका आहे.” त्यावर अभिषेक म्हणालेला, “सुरुवातीला ते थोडे औपचारिक वागत होते. मात्र, आता तसे नाही, आता कोणतीही औपचारिकता राहिली नाही. त्याचप्रमाणे माझ्या बहिणीची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण माझ्या आई-वडिलांसाठी ऐश्वर्या दुसऱ्या मुलीसारखीच आहे. एखाद्या तरुण मुलीसाठी नवीन घरात जाणं थोडं भीतीदायक असू शकतं, पण आता माझे वडील माझ्यापेक्षा तिच्याशी जास्त बोलतात.”

दरम्यान, अभिषेक व ऐश्वर्या सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतात. विविध कार्यक्रमांना ते एकत्र हजेरी लावतात. अभिषेक लवकरच राजा शिवाजी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.