Abhishek Bachchan Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी २००७ मध्ये लग्न केले. लग्नानंतर ऐश्वर्याने चित्रपटांमध्ये काम करणं खूपच कमी केलं. तिने कुटुंब आणि सासरच्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य दिलं. लग्नानंतरच्या १८ वर्षांत तिने फक्त मोजकेच चित्रपट केले आहेत. लग्न आणि मातृत्वामुळे अभिनेत्रींच्या करिअरवर परिणाम होतो, त्यांची फॅन फॉलोइंग कमी होते, असं म्हटलं जातं. याबद्दल अभिषेक बच्चनला विचारण्यात आलं. उत्तर देताना अभिषेकने हेमा मालिनींचा उल्लेख केला.

अभिषेक बच्चनने पीपिंग मूनला मुलाखत दिली. लग्न आणि मुलं याचा सुपरस्टार अभिनेत्रीच्या करिअरवर परिणाम होतो का? त्यांचे चाहते कमी होतात का? असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला. यावेळी अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या करिअरचा उल्लेख केला.

ऐश्वर्या कमी चित्रपट करत असली तरी…

अभिषेक म्हणाला, “ऐश्वर्या २०११ मध्ये आई झाल्यावर कमी चित्रपट करतेय, तिने ‘क्वांटिटी ऐवजी क्वालिटी’ निवडली असली तरी तिची जागतिक लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. आमच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत आणि मी तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली पाहिली नाही.”

हेमा मालिनींचा उल्लेख करत अभिषेक म्हणाला…

“माझ्या डोक्यात येणारं पहिलं उदाहरण म्हणजे ऐश्वर्या. पण हेमाजींदेखील आहेत. त्या पहिल्या महिला सुपरस्टार आहेत आणि लग्नानंतर त्यांचे जास्त हिट चित्रपट आले,” असं अभिषेकने नमूद केलं. प्रतिभा आणि लोकप्रियता लग्नाच्या बंधनामुळे प्रभावित होत नाही, असं स्पष्ट मत त्याने मांडलं.

abhishek bachchan on wife aishwarya rai stardom(1)
अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

लग्नानंतर प्राधान्यक्रम बदलतात – अभिषेक बच्चन

लग्न आणि मुले झाल्यानंतर महिलांच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलतात, ही गोष्ट अभिषेकने मान्य केली. त्यांच्या आयुष्यातील बदलांबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला, “अर्थातच असं होतं. जेव्हा तुमचे लक्ष्य बदलते, तेव्हा तुम्ही बदलता, तुमच्या आवडी-निवडी देखील बदलतात. आता मी एक बाबा आहे. मला माझ्या संपूर्ण कुटुंबाबद्दल एक जबाबदारी वाटते, म्हणून मी त्यानुसार स्वतःत बदल करतो.”

आयुष्य आणि परिस्थिती आपल्याला बदलतात आणि असं व्हायला हवं, असं अभिषेक बच्चनला वाटतं. “मला वाटत नाही की एखादा अभिनेता एकटा राहू शकतो आणि प्रत्येक गोष्टीत फक्त स्वतःबद्दलच विचार करू शकतो,” असं अभिषेक म्हणाला. जर एखादा अभिनेता स्वतःला महान समजू लागला तर तिथूनच गोष्टी बिघडू लागतात कारण तो आत्मसंतुष्ट होईल आणि आणखी चांगलं बनण्याचा प्रयत्न करणार नाही.