ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी नुकताच लग्नाचा १९ वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त ऐश्वर्याने पती आणि मुलीबरोबरचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. आता एका ताज्या मुलाखतीत अभिषेकने त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं. प्रेमात कधी पडले, प्रेम कधी बहरलं आणि पुढच्या वर्षी लग्नाच्या २० व्या वाढदिवसासाठी तो काय खास प्लॅन करतोय, याबाबत त्याने सांगितलं.
‘डेक्कन क्रॉनिकल’शी बोलताना अभिषेकने ऐश्वर्याबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. तो म्हणाला, “आमची पहिली भेट २००० मध्ये दिवंगत राज कंवर यांच्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.” हा त्यांनी एकत्र काम केलेला पहिला चित्रपट होता, पण त्यावेळी त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं होतं असं अभिषेकने स्पष्ट केलं.
आमचं एकमेकांशी खूप छान जमायचं – अभिषेक बच्चन
अभिषेक पुढे म्हणाला, “भविष्यात काय होणार आहे, याची तेव्हा पुसटशी कल्पनाही तेव्हा आम्हाला नव्हती. आमचं एकमेकांशी खूप छान जमायचं. पण तीच माझी आयुष्यभरासाठी जोडीदार असेल अशी शंकाही माझ्या मनात तेव्हा आली नव्हती.” त्यानंतर त्यांनी ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केलं, पण तेव्हाही ते फक्त एकमेकांचे सह-कलाकार होते.
न्यूयॉर्कमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला केलेलं प्रपोज
२००६ मध्ये, जे.पी. दत्ता यांच्या ‘उमराव जान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या नात्याचं समीरकरण बदललं. याच काळात त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. त्यानंतर मणी रत्नम यांच्या ‘गुरू’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्यांचे नातं आणखी घट्ट झालं. न्यूयॉर्कमध्ये या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी, अभिषेकने ऐश्वर्याला हॉटेलच्या बाल्कनीत लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्यानंतर लवकरच त्यांच्या कुटुंबीयांची दोघांचं लग्न ठरवलं आणि एप्रिल २००७ मध्ये एका खासगी सोहळ्यात त्यांनी लग्नगाठ बांधली.

ऐश्वर्या फक्त माझ्या मुलीची आई नाही तर…
या सुंदर नात्याच्या प्रवासाबद्दल अभिषेक म्हणाला, “आमच्या ‘गुरु’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही महिन्यांनी आमचं लग्न झालं. दिग्दर्शक मणी रत्नम आमच्यासाठी नेहमीच खास राहतील. आम्ही त्यांना जवळचे मित्र आणि गॉडफादर मानतो. आज ऐश्वर्या केवळ माझ्या मुलीची आईच नाही, तर ती माझी सोलमेट देखील आहे. आणि आराध्यावर चांगले संस्कार केल्याबद्दल मला तिचं खूप कौतुक आहे. आमच्या लग्नाची १९ वर्षे एखाद्या स्वप्नासारखी होती. लग्नाच्या २० व्या वाढदिवसासाठी मी मोठं प्लॅनिंग केलंय, पण ते मी आता सांगणार नाही.”
नात्याबद्दल सततच्या अफवा पसरत असूनही यशस्वी वैवाहिक जीवनाचं सिक्रेट काय? असं विचारल्यावर अभिषेक गमतीत म्हणाला, “दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीला न विसरता तीन वेळा ‘सॉरी’ म्हणा.”
या दोघांबद्दल एक खास किस्सा असा की अभिषेकने ऐश्वर्याला ‘गुरु’ चित्रपटात वापरलेली अंगठी देऊन लग्नाची मागणी घातली होती. ती त्याने आठवण म्हणून स्वतःकडे जपून ठेवली होती. २०१० मधील एका मुलाखतीत या प्रपोजबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली होती, “तो आमच्या नात्यासारखाच ओरिजिनल आणि खरा आहे. आमच्या आयुष्यात बोरिंग असं काहीच नाही. आम्ही एकमेकांना जपतो.”
