अभिषेक बच्चनने आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण वडील सुपरस्टार असल्याने तुलना झाली, त्याचबरोबर पत्नीच्या यशाशीही त्याची तुलना झाली. त्यामुळे त्याच्या कामाचं, अभिनयाचं कौतुक झालं नाही. त्याचबरोबर त्याला आई, वडील व पत्नीइतकं यशही मिळालं नाही. कोणत्याही कलाकारासाठी प्रेक्षकांची प्रतिक्रिया, कुटुंबातील सदस्यांची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची असते. पण अभिषेक बच्चन त्याच्या कामाबद्दल एका खास व्यक्तीची प्रतिक्रिया जाणून घेणं टाळतो. ही व्यक्ती म्हणजे अभिषेक बच्चनची लाडकी लेक आराध्या बच्चन होय.
‘आयएफपी’शी बोलताना अभिषेकला विचारण्यात आलं की, आराध्या त्याच्या चित्रपटांवर कशी प्रतिक्रिया देते? त्यावर “मी तिला कधीच विचारणार नाही,” असं स्पष्ट उत्तर त्याने दिलं. अभिषेक बच्चनने त्यामागचं कारणही सांगितलं.
तिचं मत ऐकण्याइतपत मी खंबीर नाही – अभिषेक बच्चन
“ती काय विचार करते हे मी माझ्या कल्पनेनुसार ठरवेन. एकदा का तिने उत्तर दिलं की मग तिला चित्रपट आवडलेला असो वा नसो, माझ्या कामाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलू शकतो. मी तिला विचारत नाही, कारण कदाचित तिचं मत ऐकण्याइतपत मी खंबीर नाही. तिला काय वाटत असेल किंवा वाटत नसेल, या कल्पनेत राहणंच मी पसंत करेन,” असं अभिषेक बच्चन म्हणाला.
मुलांची मतं ऐकणं कठीण जातं – अमिताभ बच्चन
आजकालची मुलं खूप स्पष्टवक्ती आणि प्रामाणिक आहेत, असंही अभिषेक बच्चनने नमूद केलं. “आताची मुलं खूप आत्मविश्वासू आहेत. त्यांना काय हवंय हे त्यांना माहित असतं. ते त्यांची मतं मांडण्यात खूप हुशार आहेत. त्यामुळे आमच्या पिढीतील लोकांसाठी कधीकधी अशी मतं ऐकणं कठीण जातं, कारण ही मुलं प्रचंड प्रामाणिक असतात. खरं तर त्यांनी तसं असायलाच हवं, पण प्रत्येक वेळी तुम्हाला ते बोलतील ते ऐकायला आवडेल असं नाही. एक बाबा म्हणून, सध्या तरी तिच्या मताचा प्रभाव न पडू देता मला माझ्या आवडीचं काम करायचं आहे. मात्र कदाचित काळाप्रमाणे हे बदलेलही,” असं अभिषेक बच्चन म्हणाला.

ती स्वतः संधी शोधेल- अमिताभ बच्चन
भविष्यात अशी एखादी वेळ येऊ शकते जेव्हा तो आराध्याला तिचं मत विचारेल, हे त्याने मान्य केलं. “देवाची इच्छा असेल आणि जेव्हा तिला स्वतःची मुलें होतील, तेव्हा कदाचित मी तिला विचारेन. पण सध्या तरी, तिच्या मतांचा माझ्या कामावर प्रभाव पडू नये असं मला वाटतं. मला नाही वाटत की मी तिला कधी विचारेन. पण मला खात्री आहे की, ती तिचं मत सांगण्याची संधी शोधेल, पण मी स्वतःहून आजवर कधीच विचारलेलं नाही,” असं अभिषेक बच्चनने म्हटलं.
आराध्या त्याचे चित्रपट पाहते की नाही, यावर अभिषेक फार बोलला नाही. मात्र, याआधी ‘द पीपिंग मून’शी बोलताना त्याने सांगितलं होतं की, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या या दोघींनीही त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. अभिषेकने याचं श्रेय ऐश्वर्याला दिलं. कारण तिने आराध्यामध्ये चित्रपटसृष्टी आणि कलेबद्दल आदर निर्माण केला आहे. “ऐश्वर्याने तिला शिकवलंय की, आज आपण जे काही आहोत ते या चित्रपट सृष्टीने आपल्याला दिलेल्या गोष्टींमुळेच आहोत,” असं अभिषेक बच्चन म्हणाला होता.
