Abhishek Bachchan reveals why he never bought an IPL team : अभिनेता अभिषेक बच्चन प्रो कबड्डी आणि फुटबॉलमधील संघांचा मालक आहे. मात्र, तो भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगपासून दूर राहिला. प्रीती झिंटा, शाहरुख खान, जुही चावला आणि शिल्पा शेट्टी सारख्या अनेक बॉलीवूड कलाकारांनी आयपीएलमध्ये गुंतवणूक केली आहे. अभिषेकने आयपीएलची टीम विकत न घेण्याचं कारण सांगितलंय.
‘फोर्ब्स’शी बोलताना अभिषेकने आयपीएल संघ न खरेदी करण्यामागचं कारण स्पष्ट केलं. तो म्हणाला, “खरं तर आयपीएल खूप मनोरंजक आहे. आयपीएल न आवडणारा माणूस तुम्हाला क्वचितच आढळेल. मला वाटतं की स्पोर्ट्स एंटरटेनमेंटच्या बाबतीत आयपीएल सर्वोत्तम आहे. मला त्याचा भाग व्हायला नक्कीच आवडेल, पण खरं सांगायचं तर, जेव्हा आयपीएल सुरू झालं तेव्हा ते खूप महाग होतं. त्यावेळी मी एक नवोदित अभिनेता होतो… माझे चित्रपट नुकतेच चांगले चालू लागले होते आणि मी थोडे चांगले पैसे कमावू लागलो होतो, पण तरीही ते माझ्या बजेटच्या बाहेर होते.”
फक्त स्टँडमध्ये बसून हात हलवणारा मी नाही – अभिषेक बच्चन
आर्थिक कारणांशिवाय, आपण या खेळाला काय योगदान देऊ शकतो, असा प्रश्नही त्याला पडला. तो पुढे म्हणाला, “महत्त्वाचं म्हणजे, मी तिथे काय योगदान देऊ शकेन हे मला माहित नव्हतं. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बीसीसीआय उत्तम काम करत आहे, मग मी नवीन काय करू शकलो असतो? फक्त स्टँडमध्ये बसून हात हलवत ‘बघा, एक स्टार आलाय’ असं मिरवणारा मी नाही.”
संघाचा मालक म्हणून आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल अभिषेक बच्चनने सांगितलं. “जर तुम्ही मला माझ्या सामन्यांच्या वेळी पाहिलं असेल, तर मी त्यात पूर्णपणे गुंतलेला असतो. मी खेळाडूंबरोबर बसतो, त्यांच्याबरोबर राहतो आणि शक्य असल्यास त्यांना प्रशिक्षणही देतो. अगदी ते रोज काय खातात, हे देखील मीच ठरवतो. मी प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीवर स्वतः लक्ष ठेवतो, मला असंच काम करायला आवडतं,” असं अभिषेक बच्चनने सांगितलं.
क्रिकेटबद्दल बोलताना त्याने कबूल केलं की, “मी त्यात काय योगदान देऊ शकेन हे मला माहित नव्हते, कारण तेव्हा मला या खेळाबद्दल आता माहित आहे, तेवढं त्यावेळी माहित नव्हतं. मला इतर खेळांची जास्त माहिती होती. त्यामुळे मी क्रिकेटमध्ये काय मदत करू शकेन, हे मला कळत नव्हतं. पण भविष्यात काहीही होऊ शकतं, कदाचित पुढे जाऊन मी या स्पर्धेचा भाग होईन,” असं अभिषेक बच्चनने नमूद केलं.
आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. हा तो काळ होता जेव्हा अभिषेक ‘धूम’, ‘धूम २’, ‘एलओसी: कारगिल’ आणि ‘गुरु’ सारख्या चित्रपटांमधून चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करत होता. त्यानंतर त्याने एप्रिल २०१४ मध्ये ‘जयपूर पिंक पँथर्स’ हा संघ खरेदी केला आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये ‘चेन्नयिन एफसी’चा सह-मालक झाला. या दोन्ही संघांनी अनुक्रमे प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीगमध्ये मोठं यश मिळवलंय.
