Abhishek Bachchan Aishwarya Rai: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या व अभिषेक यांनी २००७ साली लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या रायने चित्रपटांमध्ये काम करणं कमी केलं. काही वर्षांनी या जोडप्याने मुलगी आराध्याचं स्वागत केलं. ऐश्वर्याने लेकीच्या जन्मानंतर मोजकेच चित्रपट केले आहेत. यावरून एकदा एका सोशल मीडिया युजरने अभिषेक बच्चनला ट्रोल केलं होतं. त्यावर अभिषेक बच्चनने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
२०२३ मध्ये ऐश्वर्या बच्चन ही ‘पोन्नियिन सेल्वन २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा दाक्षिणात्य चित्रपट प्रचंड गाजला होता. अभिषेक बच्चनने ‘पोन्नियिन सेल्वन २’ हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “‘पोन्नियिन सेल्वन २’ हा एक अतिशय चांगला चित्रपट आहे. माझ्याकडे याबद्दल बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी फार आनंदी आहे. मणीरत्नम, चियान, विक्रम, त्रिशा कृष्णन आणि सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. त्या सर्वांना शुभेच्छा. मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो. तिचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम”, असं अभिषेक बच्चनने ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
युजरने नेमकं काय म्हटलं होतं?
अभिषेक बच्चनच्या या ट्वीटवर एका नेटकऱ्याने कमेंट केली होती. त्यात त्याने “सर आता तुम्ही ऐश्वर्या रायला आणखी चित्रपट साईन करू द्यायला हवे आणि आता तुम्ही आराध्याची काळजी घ्यायला हवी”, असं म्हटलं होतं. त्याला अभिषेक बच्चनने उत्तर दिलं होतं.
अभिषेक बच्चनचं उत्तर
“सर, तिने चित्रपट साईन करू द्यावेत?? तिला कोणतीही गोष्ट करण्यासाठी माझ्या परवानगीची अजिबात गरज नाही. त्यात तिला आवडणारे काम करण्यासाठी तर अजिबातच नाहीच”, असं अभिषेक बच्चन त्या युजरला म्हणाला होता. अभिषेक बच्चनचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले होते.

दरम्यान, काही काळापूर्वी अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघेही घटस्फोट घेणार आहेत, ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनबरोबर राहत नाही, घर सोडून आईबरोबर राहतेय, असंही म्हटलं गेलं होतं. पण डिसेंबर २०२५ मध्ये एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने घटस्फोटाच्या चर्चांना फालतूपणा म्हटलं होतं. “तिला (ऐश्वर्याला) माझे सत्य माहित आहे आणि मला तिचे सत्य माहित आहे. आम्ही एकत्र खूप आनंदी आहोत,” असं अभिषेक बच्चनने म्हटलं होतं.
५ फेब्रुवारी २०२६ रोजी अभिषेक बच्चनच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या रायने इन्स्टाग्रामवर एक प्रेमळ पोस्ट शेअर केली. तिने अभिषेकचा बालपणीचा फोटो शेअर करत त्याला “Baby-Papa” असं कॅप्शन दिलं होतं. तसेच त्याला सुख-शांती मिळो अशी प्रार्थना केली. या पोस्टमुळे त्यांच्यातील दुरावा असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
