Abhishek Bachchan on Amitabh Bachchan and daughter Aaradhya: अमिताभ बच्चन हे अनेकांसाठी प्रेरणा स्थान आहेत. त्यांचा अभिनय, सिनेमे, भूमिका, आवाज या सगळ्याचा चाहतावर्ग मोठा आहे. फक्त सामान्य माणसांसाठीच नाही तर कलाकारांना अमिताभ बच्चन यांच्यापासून प्रेरणा मिळते.
अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन हासुद्धा याला अपवाद नाही. मात्र, अभिषेकच्या आयुष्यात प्रेरणास्थानी फक्त अमिताभ बच्चन नाहीत तर आणखी एक व्यक्ती आहे. अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वक्तव्य केले. आता अभिषेक बच्चन नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…
“मला नवीन पीढीबद्दल…”
अभिषेकने नुकतीच ‘टाइम्स नाऊ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “मला माझ्या वडिलांपासून आणि मुलीपासून प्रेरणा मिळते.नव्या पिढीत साधेपणा आणि विचारांची स्पष्टता आहे. तसे पाहायला गेले तर जर तुमच्या खोलीच्या वरच्या खोलीत अमिताभ बच्चन झोपत असतील, तर तुम्हाला दुसरीकडे प्रेरणा शोधण्याची गरज भासत नाही. ते सगळ्या पोकळ्या भरून काढतात. पण, प्रेरणा म्हणून त्यांच्याशिवाय इतर कोणाकडे पाहत असेल तर ती माझी मुलगी आहे. मला नवीन पीढीबद्दल ईर्ष्या वाटते. त्यांचा हेवा वाटतो. त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता असते. त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे.”
आराध्याच्या पीढीला तुम्ही काय सल्ला द्याल? असे विचारल्यानंतर अभिषेक बच्चन म्हणाला, “तुम्ही त्यांना सल्ला देऊ शकत नाही. ते तुम्हाला सल्ला देतील. त्यांचे ऐका. ते तुमचे भवितव्य आहेत. एका किशोरवयीन मुलीचा पालक म्हणून मला असे वाटते की तुम्ही जितका जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवाल, तितके तुमच्या लक्षात येईल की ते खूप समजूतदार आणि व्यवस्थित विचार करणारे आहेत.”
अभिषेक असेही म्हणाला, “आताच्या पीढीचे आयुष्य माझ्या पीढीपेक्षा आणि किंवा माझ्या आधीच्या पीढीपेक्षा खूप वेगळे आहे.आपण असे म्हणतो की आम्ही जे म्हणतो ते बरोबर आहे. पण आपण ज्या परिस्थितीत वाढलो, त्यापेक्षा संपूर्णत: वेगळ्या विश्वात ते राहतात. ते मोबाईल फोन्स, सोशल मिडिया, कॅमेरा या सगळ्याबरोबर मोठे होत आहेत. आपल्याला तेव्हा याबद्दल माहितही नव्हते. त्यांनी त्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदलही केले आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांना काही शिकवण्याची, सांगण्याची गरज नाही. “
अभिषेकच्या अलीकडील चित्रपटांत त्याने प्रामुख्याने वडिलांच्या किंवा वडिलांभोवती गोष्ट असणाऱ्या भूमिका साकारल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल त्याने एका मुलाखतीत वक्तव्य केले होते. हॉलीवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणालेला, “जाणीवपूर्वक मी अशा भूमिका शोधत आहे असं मला वाटत नाही. पण या सर्वांमध्ये एक समान धागा आहे हे माझ्या लक्षात आले. त्याचे श्रेय मी जगातील सर्वात सुंदर स्त्रीला, माझ्या मुलीला देतो.”
“जेव्हा मी ब्रीथ (Breathe), लुडो, बॉब बिस्वास, बी हॅपी, आय वॉन्ट टू टॉक, कालीधर लापता, या चित्रपटांत काम केले. तेव्हा त्या भूमिकांमधून मला वडिलांच्या भावना समजल्या. कारण तेच मी माझ्या खऱ्या आयुष्यातही अनुभवत होतो.”
दरम्यान, अभिषेक बच्चन लवकरच शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या द किंग या चित्रपटात दिसणार आहे. तसेच, तो राजा शिवाजीमध्ये देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

