मुंबईतील महालक्ष्मी हा दक्षिण मुंबईतील एक अत्यंत उच्चभ्रू आणि प्रीमियम रिअल इस्टेट भाग मानला जातो. महालक्ष्मीमध्ये प्रॉपर्टीचे दर प्रामुख्याने इमारतीचे स्थान, उपलब्ध सोयीसुविधा आणि तिथून दिसणारा व्ह्यू (रेसकोर्स किंवा समुद्र) यावर अवलंबून असतात. याच महालक्ष्मी भागातील अपार्टमेंट अभिनेता अभिषेक बच्चनने विकले आहे.
महालक्ष्मी भागात सरासरी दर ५५,००० ते ६५,००० प्रति चौरस फूट आहेत. नुकत्याच झालेल्या अभिषेक बच्चनच्या व्यवहारानुसार, त्याने त्याचे अपार्टमेंट ६४,४७३ प्रति चौरस फूट या दराने विकले आहे. झॅपकीवरील नोंदणी कागदपत्रांनुसार, अभिषेक बच्चनने मुंबईतील महालक्ष्मी येथील एक आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट १४.५ कोटी रुपयांना विकले आहे. या अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ २,२४९ चौरस फूट आहे. रजिस्ट्रेशन रेकॉर्डनुसार, हे अपार्टमेंट बेन कॅपिटल प्रायव्हेट इक्विटीचे भागीदार ऋषी मांडवत आणि स्मिता मेहता यांनी घेतले आहे.
कुठे आहे अपार्टमेंट?
हे डुप्लेक्स अपार्टमेंट महालक्ष्मी येथील ‘प्लॅनेट गोदरेज’ (Planet Godrej) या प्रीमियम निवासी प्रकल्पात आहे. गोदरेज प्लॅनेट हा एक आलिशान रेसडेन्शियल भाग आहे, ज्यामध्ये पाच टॉवर्समध्ये ३०० हून अधिक अपार्टमेंट आहेत. त्याअंतर्गत दक्षिण मुंबईतील या उच्चभ्रू परिसरात २, ३ आणि ५ बीएचके अपार्टमेंट आहेत. अभिषेकचे अपार्टमेंट टॉवर ४ (Strata) मधील ४० व्या आणि ४१ व्या मजल्यावर आहे. या व्यवहारामध्ये अपार्टमेंटसोबत तीन कार पार्किंग स्लॉटचा देखील समावेश आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलंय.
हे आलिशान अपार्टमेंट ऋषी मंडावत आणि स्मिता मेहता यांनी खरेदी केले असून या व्यवहारासाठी त्यांनी सुमारे ८९.७६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे.
अभिषेक बच्चनने अलिकडे मुंबईत केलेली गुंतवणूक
अभिषेक बच्चन सध्या रिअल इस्टेटमध्ये खूप गुंतवणूक करतोय. यापूर्वी त्याने बोरिवली येथील ओबेरॉय स्काय सिटी येथे ६ अपार्टमेंट्स खरेदी केले होते. मुलुंड (ओबेरॉय एटर्निया) इथेही त्याने वडील अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मिळून मालमत्ता खरेदी केली आहे. तसेच अभिषेक बच्चनने GIFT City गुजरात येथे रिअल इस्टेट उद्योजक आनंद पंडित यांच्याबरोबर मिळून एका मोठ्या कमर्शियल प्रकल्पातही गुंतवणूक केली आहे.
अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट जून २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, सोनम बाजवा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासह इतर कलाकारांनीही भूमिका केल्या होत्या. हा लोकप्रिय ‘हाऊसफुल’ फ्रँचायझीचा पाचवा भाग होता.

