५ एप्रिल रोजी पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ मध्ये, अभिषेक बॅनर्जीची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्टोलन’ चित्रपटाने ओटीटी कॅटेगरीत मोठे यश मिळवले. या चित्रपटाने चार महत्त्वाचे पुरस्कार आपल्या नावावर केले. ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट, करण तेजपाल सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिषेक बॅनर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा. कास्टिंग डायरेक्टर ते अभिनेता असा प्रवास करणाऱ्या अभिषेकसाठी या चित्रपटाचे यश म्हणजे स्वतंत्र चित्रपटांच्या कष्टाला मिळालेली पावती आहे.
या विजयाबद्दल बोलताना अभिषेक बॅनर्जी ‘SCREEN’ ला म्हणाला, “मला खूप मोठे समाधान वाटतंय, कारण जेव्हा तुम्ही भविष्याची काळजी न करता कठोर परिश्रम करता, तेव्हा ती कोणत्याही प्रकल्पासाठी लावलेली पराकोटीची मेहनत असते. जेव्हा तुम्ही बॉलीवूड किंवा प्रस्थापित फिल्म इंडस्ट्रीत काम करता, तेव्हा तुम्हाला माहीत असते की चित्रपट चित्रपटगृहात किंवा OTT वर प्रदर्शित होणारच आहे. पण जेव्हा तुम्ही ‘स्टोलन’ सारखा चित्रपट करता, तेव्हा तो कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल की नाही, हे तुम्हाला माहीत नसते.”
तो पुढे म्हणाला, “तुम्ही फक्त एक भूमिका साकारत असता. तुम्ही तुमच्या मनाचे ऐकता आणि ज्यांना कधी भेटला नाही अशा लोकांवर विश्वास ठेवता. पूर्णपणे अनोळखी लोकांशी मैत्री करून चित्रपट करणे आणि त्यानंतर देशातील सर्वात जुन्या, प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पुरस्कार सोहळ्यात असे यश मिळवणे, हा अनुभव खूप काही सांगून जाणारा आहे. मला वाटते की हा सर्व स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांचा आणि तरुणांचा मोठा विजय आहे. हे सिद्ध करते की तुम्ही कुठलेही असा, जर तुम्ही चांगला चित्रपट बनवलात, तर त्याचे यश आणि प्रसिद्धी तुम्हाला नक्कीच मिळते.”
अभिषेक बॅनर्जीने त्याच्या अभिनयातील वैविध्याबद्दलही भाष्य केलं. ‘स्त्री’ (Stree) मधील ‘जाना’ बनून प्रेक्षकांना हसवणे असो, ‘पाताल लोक’ (Paatal Lok) मधील ‘विशाल त्यागी’ म्हणून अस्वस्थ करणे असो किंवा ‘स्टोलन’ (Stolen) मध्ये एक दुःखद आणि हतबल पात्र साकारणे असो.
सुरुवातीला गमतीत “मला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे,” असं त्याने म्हटलं. “माझा असा विश्वास आहे की आपण मानवांमध्ये सर्व प्रकारचे गुण आणि स्वभाव असतात. फरक इतकाच आहे की आपण दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करत नाही, परंतु अभिनेता म्हणून आम्हाला आमच्या कौशल्याद्वारे त्या भावना जागृत करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे कोणतेही अद्भूत टॅलेंट नाही, तर अनेक वर्षांचा सराव तुम्हाला एक उत्तम अभिनेता बनवतो,” असं अभिषेक बॅनर्जी म्हणाला.
