बॉलीवूड मनोरंजनविश्वात सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांची लगीनघाई सुरू आहे, तर काही कलाकारांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन होणार आहे. दीपिका व रणवीरने दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी नुकतीच त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे आणि, आता या पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. ‘दृश्यम २’ सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालेलं आहे.
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज ( १९ एप्रिल २०२६ ) शिवालिका आणि अभिषेक यांना कन्यारत्न झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी या जोडप्याने त्यांच्या सगळ्या चाहत्यांना दिली आहे. शिवालिका लिहिते, “आमच्या घरी आज शुभदिनी छोट्या लक्ष्मीचं आगमन झालं आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम कायम सोबत राहुद्यात.”
‘दृश्यम २’ फेम बॉलीवूड दिग्दर्शक अभिषेक पाठकने ९ फेब्रुवारी २०२३ रोजी गर्लफ्रेंड शिवालिका ओबेरॉयशी लग्नगाठ बांधली होती. या दोघांची पहिली भेट २०२० मध्ये ‘खुदा हाफिज’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. यानंतर २०२२ मध्ये या दोघांनी साखरपुडा केला आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवालिकाने ती आई होणार असल्याची गुडन्यूज सर्वांना दिली होती. यानंतर तिचं मॅटर्निटी फोटोशूट सुद्धा चर्चेत आलं होतं. आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. शिवालिका सध्या ३० वर्षांची असून, तिचा पती दिग्दर्शक अभिषेक पाठक तिच्यापेक्षा वयाने आठ वर्षांनी मोठा आहे.
शिवालिका व अभिषेक यांच्यावर संपूर्ण मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. किश्वर मर्चंट, सोनाली सेहगल, करण मेहरा, इशिता दत्ता, रिद्धिमा पंडित अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स करत या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, शिवालिका ओबेरॉयने २०१९ मध्ये ‘ये साली आशिकी’ या चित्रपटातून पदार्पण करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण, ‘खुदा हाफिज’ सिनेमामुळे तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. तर, अभिषेकने ‘दृश्यम २’ आणि ‘उडता चमन’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आता लवकरच त्याचा ‘दृश्यम ३’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
