१९६० आणि ७० च्या दशकात अचला सचदेव यांना मदर ऑफ बॉलीवूड असे संबोधले जायचे. याचे कारण म्हणजे त्यांनी चित्रपटांत आई आणि आजीच्या भूमिका मोठ्या प्रमाणात साकारल्या. याच भूमिकांमधून त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियतादेखील मिळाली.
अचला सचदेव यांनी त्यांच्या कारकिर्दीत २५० हून अधिक सिनेमांत काम केले. बॉलीवूडच्या त्या प्रसिद्ध आई आणि आजी झाल्या. चित्रपटांबरोबरच अचला सचदेव यांच्या खासगी आयुष्याचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्यांना अनेक अचडणींचा सामना करावा लागला.
दोन लग्न केली, मुलाने साथ सोडली
३ मे १९२० रोजी पाकिस्तानमधील पेशावर येथील पंजाबी कुटुंबात अचला सचदेव यांचा जन्म झाला. त्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा निधन झाले. कुटुंबाला आधार देण्यासाठी, अचला यांनी लाहोर येथील ऑल इंडिया रेडिओमध्ये रेडिओ निवेदिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब पेशावरहून दिल्लीला स्थलांतरित झाले. दिल्लीत स्थायिक झाल्यावर, अचला यांनी ऑल इंडिया रेडिओ, दिल्ली येथे काम करण्यास सुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओमधील आपल्या कार्यकाळात, त्यांनी चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
१९५० साली प्रदर्शित झालेल्या ‘दिलरुबा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
‘दिलरुबा’च्या यशानंतर अचला बॉलिवूडच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या. त्यानंतर, त्यांनी ‘संगम’, ‘फुटपाथ’, ‘दिल एक मंदिर’, ‘वक्त’, मेरा नाम जोकर, हकीकत, हिमालय की गोद में आणि ‘मिस मेरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अचला यांची ‘वक्त’ (१९६५) या चित्रपटांतील भूमिकादेखील लोकप्रिय ठरली. या सिनेमात त्यांनी बलराज साहनी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. सिनेमातील ‘ए मेरी झोहरा जबी’ हे गाणे लोकप्रिय ठरले. आजही या गाण्याचा चाहतावर्ग मोठा आहे.
अचला सचदेव यांचे वैयक्तिक आयुष्यातही चढ उतार आले. त्यांनी दोनदा लग्न केले. त्यांचे पहिले पती, ज्ञान सचदेव हे दिग्दर्शक होते आणि त्यांना ज्योतिन सचदेव नावाचा एक मुलगा होता. मात्र, काही वर्षांनंतर अचला आणि ज्ञान यांचे लग्न मोडले आणि त्यांचा मुलगा अमेरिकेला निघून गेला. यानंतर, अचला यांनी क्लिफोर्ड डगलस पीटर्स यांच्याशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर ते पुण्यात स्थायिक झाले, पण काही काळानंतरच पीटर्स यांचे निधन झाले. पीटर्स यांच्या निधनानंतर अचला पुन्हा एकदा एकट्या पडल्या.
अचला यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस अत्यंत कठीण होते. सप्टेंबर २०११ मध्ये त्या स्वयंपाकघरात घसरून पडल्या आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांच्या मेंदूत अनेक रक्ताच्या गुठळ्या (एम्बोलिझम) असल्याचे निदान झाले. त्यांना लकवा मारला आणि त्यांची दृष्टी गेली. त्यांची प्रकृती हळूहळू खालावत गेली. शेवटच्या दिवसांत त्यांना ओळखणेही कठीण झाले होते. रुग्णालयात जवळपास तीन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, ३० एप्रिल २०१२ रोजी त्यांचे निधन झाले. या काळात त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर नव्हता.
