‘हॉलीडे’ , ‘गब्बर इज बॅक’, तर कधी ‘हेरा फेरी’ आणि ‘खट्टा मिठा’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून अभिनेता अक्षय कुमार याने प्रेक्षकांची मनं जिंकली. कधी विनोदी अभिनेता तर कधी अ‍ॅक्शन हिरो म्हणून अक्षयला चाहत्यांचं कायमच भरभरून प्रेम मिळत आहे. आज हा बॉलीवूडचा खिलाडी त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अक्षयच्या नव्या सिनेमाचं नाव ‘भूत बंगला’ असं आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये अक्षयच्या खांद्यावर एक काळी मांजर दिसत आहे, त्याचबरोबर त्याच्या मागेदेखील एक भयाण बंगला दिसत आहे. आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करत, अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. अक्षय म्हणाला की, “दरवर्षी तुम्ही माझ्या वाढदिवसाला मला शुभेच्छा देत असता, तुम्ही जे प्रेम मला देत आहात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.” पुढे तो असंही म्हणाला की, “आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी ‘भूत बंगला’ या माझ्या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करत आहे. १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रियदर्शनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. खूप वर्षांपासून प्रियदर्शनसोबत काम करण्याचं स्वप्नं आता सत्यात उतरताना दिसत आहे”, अशा शब्दांत अक्षयने त्याच्या भावना मांडल्या आहेत.

हेही वाचा- “तुमची निष्ठा, तुमचा दृष्टिकोन…”, अंकिता लोखंडेने संजय लीला भन्साळींसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

चौदा वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन येणार एकत्र

अक्षयचा हा सिनेमा २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बालाजी टेलिफिल्म्स निर्मित ‘भूत बंगला’ या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. या आधी अक्षय कुमारच्या ‘भूलभुलैय्या’ या हॉरर कॉमेडी सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं होतं. तब्बल १४ वर्षांच्या कालावधीनंतर आता अक्षय आणि प्रियदर्शन हे एकत्र काम करणार आहेत.

हेही वाचा – Video : भावाच्या रक्षणासाठी काहीही, आलिया भट्टच्या बहुचर्चित ‘जिगरा’चा टीझर ट्रेलर प्रदर्शित; स्टंट्स आणि अ‍ॅक्शन…

अक्षयच्या या आगामी सिनेमासाठी सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अक्षयच्या ‘भूलभुलैय्या’ सिनेमाला प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर भरभरून पसंती दर्शवली होती. आता त्याच्या या आगामी सिनेमालादेखील प्रेक्षकांचा तेवढाच प्रतिसाद मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.