Akshay Kumar Gives Riteish Deshmukh & Genelia Deshmukh Marriage Advice : अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना, जिनिलीया व रितेश देशमुख हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना व रितेश-जिनिलीया अनेकदा त्यांच्या एकमेकांबरोबरच्या नात्याबद्दल बोलताना दिसतात. अशातच आता अक्षय कुमारने त्याच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे आणि रितेशला एक सल्लाही दिला आहे.
अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘सोनी टीव्ही’वरील नवीन कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या शोच्या एका प्रोमोदरम्यान रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख व श्रेयस तळपदे हे तिघे उपस्थित होते. उल्लेख केलेल्या वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अक्षय कुमार रितेशला ‘तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली आहेत?’ असं विचारतो. त्यावर रितेश “दहा वर्षे डेटिंगचे आणि १४ वर्ष लग्नाची,” असं उत्तर देतो. त्यावर अक्षय माझ्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत असं म्हणतो. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर असलेले हावभाव पाहून रितेश-जिनिलीया व श्रेयस हसतात आणि रितेश त्याला मिठी मारतो.
अक्षय कुमारने दिला सल्ला
प्रोमोमध्ये पुढे अक्षय रितेशला, “माझ्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत. मला विचार, सॉरी बोलायला शिका” असं म्हणतो. त्यावर जिनिलीया “हा तर सॉरी देशमुख आहे” असं म्हणते. त्यानंतर रितेश “मी आधीच सॉरी बोलून टाकतो” असं म्हणतो. रितेश-जिनिलीयाचं बोलणं ऐकल्यानंतर अक्षय कुमार पुढे ट्विंकल खन्नाचा एक किस्सा सांगतो.
अक्षय कुमारने सांगितला ‘तो’ किस्सा
अक्षय कुमार त्याच्या बायकोबद्दल म्हणतो, “माझ्या बायकोचं वेगळं आहे. माझी बायको जेव्हा रागावते तेव्हा मला ते कधी कळतं माहितीये का? जेव्हा मी झोपायला जातो. कारण जेव्हा मी झोपायला जातो, तेव्हा माझ्या बाजूच्या बेडवर ओलं असतं. ती मी झोपतो तिथे पाणी टाकते.” रितेश त्यावर अक्षयला मिठी मारून गमतीत, “खरंच, आय लव्ह यू टीना” असं म्हणतो.
दरम्यान, अक्षय कुमार सोनी टीव्हीवरील व्हिल ऑफ फॉर्च्युन या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २७ जानेवारी रोजी सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
