Akshay Kumar Shares His Vishno Devi Experience : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘भूत बंगला’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याने आपल्या बालपणातील एक चकित करणारा किस्सा शेअर केला आहे.

अक्षयने खुलासा केला की, त्याच्या जन्मानंतर काही काळातच अशी वेळ आली होती की, त्याच्या पालकांनी त्याला जवळजवळ गमावलेच होते. अक्षय कुमारबरोबर नेमकं असं काय घडलं होतं? चला जाणून घेऊ…

HT City ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने सांगितले की, त्याच्या पालकांनी वैष्णोदेवीच्या मंदिरात जाऊन “आम्हाला एक खोडकर मूल दे”, अशी प्रार्थना केली होती. अक्षय म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी वैष्णोदेवीला नवस केला होता. त्यांना मूल हवे होते. त्यांनी देवाला सांगितले की, मूल द्या पण ते खोडकर असू दे. त्यानंतर एका वर्षात माझा जन्म झाला.”

“मी पूर्णपणे बेशुद्ध झालो होतो”

अक्षयच्या पहिल्या वाढदिवसानंतर त्याचे आई-वडील नवस फेडण्यासाठी पुन्हा वैष्णोदेवीला गेले. याबद्दल अक्षय म्हणाला, “आई-वडील मला त्यांच्याबरोबर घेऊन निघाले होते. पण वाटेतच मी अचानक खूप आजारी पडलो. मला १०३-१०४ डिग्री ताप भरला आणि मी बेशुद्ध झालो. कटरा येथील डॉक्टरांनी मला तातडीने दिल्लीला नेण्याचा सल्ला दिला. तेव्हा कटरामध्ये फारशा वैद्यकीय सुविधा नव्हत्या.” अक्षयच्या आईचा देवावर खूप विश्वास होता. ती म्हणाली, “जर देवीनेच हा मुलगा दिला असेल आणि तिची इच्छा असेल तर ती त्याला परतही नेऊ शकते. पण आम्ही मागे फिरणार नाही, आम्ही आमची यात्रा पूर्ण करणारच.”

यापुढे अक्षय म्हणाला, “त्यावेळी मी लाल रंगाचा फ्रॉक घातला होता, जो आजही माझ्याकडे जपून ठेवलेला आहे. मी बेशुद्ध होतो. आई-बाबांनी मला मंदिरात नेले, तिथे अंघोळ घातली आणि रडत रडत प्रार्थना केली.”

“माझा ताप अचानक उतरला”

त्याचक्षणी एका अनोळखी व्यक्तीने अक्षयच्या वडिलांना विचारले, “तुमच्या मुलाचे हास्य किती सुंदर आहे ना?” अक्षय पुढे सांगतो, “माझ्या वडिलांनी माझ्याकडे पाहिले तर मी चक्क हसत होतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझा ताप अचानक उतरला आणि मी पूर्णपणे बरा झालो. मला माहित नाही की, मला कोणते औषध दिले गेले. पण तिथल्या वातावरणात आणि ऊर्जेत काहीतरी वेगळे होते, ज्यामुळे मी आपोआप बरा झालो.”