नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या फ्लॅश फ्लडने भयंकर हाहाकार माजला आहे. हजारो लोक बेपत्ता आहेत. यात मोठ्या संख्येने भारतीयांचा देखील समावेश आहे. या महापुरात प्रसिद्ध अभिनेता सुद्धा अडकणार होता. महापूर येण्याच्या काही तास आधी हा अभिनेता त्याभागात कुटुंबासह उपस्थित होता. मात्र, तो यातून थोडक्यात बचावला आहे. हा थरारक अनुभव अभिनेत्याने नुकताच शेअर केला आहे.
‘माई’ वेब सीरिज आणि काही चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता अंकुर रतन कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेला आहे. तो महाराष्ट्रातील नोंदणीकृत गिर्यारोहण क्लब ‘साद माउंटनिअर्स’च्या एका गटासह प्रवास करत आहे.
अंकुर रतन गुरुवारी ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना म्हणाला, “आम्ही सर्वजण कैलास मानसरोवर यात्रेसाठी खूपच उत्सुक होतो. पूर येण्याच्या काही तास आधी माझी पत्नी, चुलत बहीण आणि मी… आम्ही सगळे त्याचठिकाणी फोटो काढत होतो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, ते आपत्तीच्या ठिकाणापासून अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर होतं. सुदैवाने आम्ही यामधून सुरक्षित वाचलो.”
या अभिनेत्याने पुढे सांगितलं, “माझी पत्नी शिल्पा सुचक, तिची चुलत बहीण सोनाली कापडिया आणि मी स्वतः, आम्ही ज्या ठिकाणाहून जवळपास १२ ते १६ तास आधीच प्रवास केला होता, तिथेच ही घटना घडलीये; ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावलेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो.”
ग्लेशियरचा मोठा भाग तुटून खाली कोसळल्यामुळे हा फ्लॅश फ्लड आल्याचं सांगितलं जात आहे. उपग्रह छायाचित्रांच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. ग्लेशियरचा खालचा भाग सुमारे ५,२०० मीटर उंचीवरून तुटून जवळपास १,२०० मीटर खाली खोऱ्यात कोसळला. त्यानंतर हा विशाल महापूर आला.
नेपाळ पोलिसांच्या अहवालानुसार, आतापर्यंत १५७ मृतदेह सापडले असले तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये १३३ भारतीय, ४७ अमेरिकन, ३४ ऑस्ट्रेलियन, ३३ ब्रिटीश नागरिक, २४ कॅनेडियन इत्यादींचा समावेश आहे.
