मराठीसह बॉलीवूड, भोजपुरी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून अशोक समर्थ यांना ओळखलं जातं. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यांनी ‘सिंघम’मध्ये साकारलेलं शिवाचं पात्र घराघरांत तुफान गाजलं. यानंतर अशोक समर्थ यांनी बऱ्याच गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. रणवीर सिंहच्या ‘सिंबा’मध्ये सुद्धा त्यांनी साकारलेली वकिलाची भूमिका सर्वत्र गाजली.
नुकतीच अशोक समर्थ यांनी ‘Red FM मराठी’ला मुलाखत दिली. प्रत्येक यशस्वी कलाकाराच्या प्रवासात एक ‘Godfather’ असतो जो त्याच्यावर नेहमी विश्वास ठेवतो, असा तुमच्या आयुष्यातील गॉडफादर कोण आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अशोक समर्थ यांनी ‘सिंघम’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीचं नाव घेतलं.
अशोक समर्थ म्हणाले, “रंगभूमी माझ्यासाठी गॉडफादर आहे…पण गॉडफादर म्हणून एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल तर मी म्हणेन रोहित शेट्टी. मी आज जो काही आहे…त्याचं श्रेय ‘सिंघम’ सिनेमाला जातं. ‘सिंघम’मध्ये जेव्हा शिवाला अटक होते…तेव्हा सेटवर पाच कॅमेरे लावण्यात आले होते. तेव्हा अजय सर ( अजय देवगण ) गमतीत म्हणाले, ‘मला तर फक्त अशोकला पट्ट्याने मारायचंय आणि त्याला सगळे डायलॉग म्हणायचे आहेत….त्यामुळे रोहित अशोकला विचारून घे की, या सीनला आपण वन शॉट करू शकतो का?’ आता ही गंमत वगैरे असेल…मला काहीच माहिती नव्हतं. मी अजय सरांचं म्हणणं फार सिरिअसली घेतलं. मी त्यांना म्हटलं मला जरा १५ मिनिटं द्या. रोहित सर म्हणाले, ‘ठिके आहे घे १५ मिनिटं…नो प्रॉब्लेम!”
“बघता बघता सेटवर ५ कॅमेरे लागले…तेव्हा अजय सर म्हणाले, ‘बघ अशोक… मला तुला बेल्टने मारायचंय आणि तुला डायलॉग बोलायचेत. तू नीट तयार राहा’ रोहित सरांनी कॅमेऱ्याची परफेक्ट प्लेसमेंट केली होती आणि पाचपैकी एक कॅमेरा त्यांच्या खांद्यावर होता. सिंघम शिवाला मारतोय…हा संपूर्ण सीक्वेन्स वन शॉट शूट झालाय. हा आत्मविश्वास माझ्यात रोहित सरांमुळे निर्माण झाला. तो सीन वनशॉट घेतल्यामुळे इतका रिलेट झाला…एनर्जी सुद्धा दिसून आली. म्हणून तो सीन अजरामर ठरला.”
“माझ्या आयुष्यात रोहित सरांचं येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आताही मी त्यांच्याबरोबर एका मोठ्या सिनेमात काम करतोय. त्यामुळेच मी गॉडफादर म्हणून रोहित शेट्टीचं नाव घेईन.” असं अशोक समर्थ यांनी सांगितलं.
