Actor Dharmendra Book Hospital For Hema Malini : सोमवारी (२४ नोव्हेंबर) एक अत्यंत दु:खद घटना घडली, ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची. बॉलीवूडच्या ‘ही-मॅन’नं आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली. त्यांचं अचानक निघून जाणं अनेकांच्या जिव्हारी लागलं. धर्मेंद्र यांच्या निधनानं पत्नी हेमा मालिनी यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

बॉलीवूड सिनेमात हीरो असलेले धर्मेंद्र हे खऱ्या आयुष्यातही हीरोच होते. त्यांचं हेमा मालिनी यांच्यावर जीवापाड प्रेम होतं. दोघांचं हे प्रेम अनेकदा सिनेमा आणि सोशल मीडियावरील फोटो-व्हिडीओंमधून पाहायलाही मिळालं आहे. अशातच धर्मेंद्र यांच्या हेमा मालिनींवरील प्रेमाची एक उल्लेखनीय कहाणी आहे आणि ती म्हणजे धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी गरोदर असताना ईशा व अहाना या मुलींच्या जन्मापूर्वी संपूर्ण हॉस्पिटलच बुक केलं होतं.

ईशा देओलच्या जन्मावेळी धर्मेंद्र यांनी संपूर्ण हॉस्पिटल केलेलं बुक

कपिल शर्मा शोमध्ये हेमा मालिनींनी स्वत: याबाबत खुलासा केला होता. ईशा व अहानाच्या जन्मापूर्वी खरोखरच संपूर्ण हॉस्पिटल बुक केलं होतं का, असा प्रश्न हेमा मालिनींना विचारण्यात आला होता. तेव्हा त्याला दुजोरा देत म्हणालेल्या, “हो, हे खरं आहे. ईशा व अहानाच्या जन्मापूर्वी धर्मेंद्र यांनी माझ्यासाठी संपूर्ण हॉस्पिटल बुक केले होतं, जेणेकरून मला चाहत्यांकडून त्रास होऊ नये.”

हेमा मालिनींची जवळची मैत्रीण नीतू कोहली यांनीही ‘जीना इसी का नाम है’ शोमध्ये सांगितलं होतं, “ईशा व अहानाच्या जन्मापूर्वीनर्सिंग होमच्या सर्व १०० खोल्या बुक केल्या होत्या.” त्या म्हणाल्या होत्या, “हेमा प्रेग्नंट आहे. हे कोणालाही माहीत नव्हतं. धरमजींनी तिला शांतता आणि एकांत मिळावा, यासाठी हॉस्पिटलमधील सर्व १०० खोल्या बुक केल्या होत्या.”

दरम्यान, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे बॉलीवूडमधलं एक ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखलं जातं. जेव्हा धर्मेंद्र यांना हेमा मालिनी आवडायला लागल्या, तेव्हा ते आधीच विवाहित होते. त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता, हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं होतं.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे दोन मुलींचे पालक झाले. त्यांना ईशा व अहाना देओल अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.