Dibyendu Bhattacharya Bollywood racism : सिनेविश्व हे ग्लॅमर आणि फॅशनसाठी ओळखले जाते. अभिनयासह कलाकारांच्या सौंदर्यावर अधिक भर दिला जातो. या झगमगाटी दुनियेत अनेकदा अभिनयापेक्षा पडद्यावर कोण अधिक आकर्षक दिसते, यालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सिनेविश्वामध्ये वर्णभेद आणि रंगभेदाचे लोण पसरत चालले आहे. याचा फटका हरहुन्नरी कलाकारांनाही बसला आहे. कृष्णवर्णीय आणि सावळ्या रंगाच्या अभिनेता किंवा अभिनेत्रींना थेट बाहेरचा रस्ता दाखवला जातो याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जाहिरातीचे शूटिंग अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना बॉलीवूड अभिनेता दिव्येंदू भट्टाचार्य यांना ‘तुम्ही काळे आहात…’ असे सांगून काढून टाकण्यात आले.
बॉलीवूड बबल या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलीवूड अभिनेता दिव्येंदू भट्टाचार्य यांनी सिनेविश्वातील काळे सत्य समोर आणले आहे. आजही सिनेविश्वामध्ये कास्टिंग काऊच असून, १०० टक्के यावरून कलाकारांची निवड केली जात असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.
तसेच काही नवीन कलाकारांना ते फक्त गोरे दिसत आहेत आणि सुंदर आहेत म्हणून काम दिले जाते. आणि नंतर शूटिंगच्या वेळी त्यांना एक डायलॉग बोलता येत नाही. त्यांना डायलॉगसाठी टेलिप्रॉम्प्टर वापरावे लागतात. अगदी या नवीन कलाकारांचे ५६ टेक झाल्याचेही मी पाहिले असल्याचे दिव्येंदू भट्टाचार्य यांनी सांगितले.
बॉलीवूडमध्ये कलाकारांच्या त्वचेच्या रंगावरून त्याची निवड केली जात असल्याचे अभिनेता दिव्येंदू भट्टाचार्य यांनी सांगितले. याबाबत त्यांनी स्वतःचा अनुभवदेखील सांगितला. तुम्ही काळे आहात म्हणून तुम्हाला बदलले असल्याचे चित्रपट निर्मात्यांकडून सांगण्यात आले.
निर्मात्यांकडून सावळ्या रंगामुळे अपमान
वर्णभेदाचा अनुभव सांगताना दिव्येंदू म्हणाले, “ही एक अत्यंत खोलवर रुजलेली समस्या आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच एका जाहिरातीसाठी माझी निवड झाली होती. चार-पाच दिवस त्याबाबत चर्चा सुरू होती आणि त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत चित्रीकरण होणार होते. त्यामुळे मी त्यांना विचारलं, ‘आपण हे चित्रीकरण करणार आहोत की नाही?’ त्यावर ते म्हणाले, ‘नाही दादा, तुमची जागा दुसऱ्यानं घेतली आहे (तुम्हाला बदललं आहे). कारण- तुम्ही काळे आहात आणि आम्हाला काळा अभिनेता नको आहे.”
सामाजिक मूल्ये आणि नीतिमत्ता रुजवण्याची गरज
काळा अभिनेता आम्हाला नको, असेच शब्द निर्मात्यांचे असल्याचे दिव्येंदू भट्टाचार्य यांनी सांगितले. मी माझ्या रंगासह खूश आहे. त्यांच्या बोलण्याने माझ्यावर वैयक्तिक परिणाम झाला नाही. पण, लोकांवर लहानपणापासून आणि कुटुंबातून झालेल्या संस्कारांचे हे प्रतिबिंब असते. जर तुम्ही तुमच्या प्राथमिक शिक्षणाच्या पायातच सामाजिक नीतिमत्ता आणि नियम रुजवले नाहीत, तर तुम्ही हे करू शकत नाही, अशी खंतदेखील दिव्येंदू भट्टाचार्य यांनी व्यक्त केली. हे मूल्य जपान आणि कोरिया देशामध्ये प्राथमिक शाळांपासून शिकवले जाते आणि भारतामध्ये घरातून ही शिकवण देण्याची गरज असल्याचे दिव्येंदू भट्टाचार्य यांनी सांगितले.
