ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांचे आज (९ मार्च) निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाचे ट्वीट करत चाहत्यांना ही बातमी दिली. सतीश कौशिक यांच्या अकाली निधनाचे कारण नुकतंच समोर आलं आहे.
सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील लोक पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. सतीश कौशिक यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूवेळी ते दिल्ली एनसीआर या ठिकाणी होते.
आणखी वाचा : “तुम्हा सर्वांना…” सतीश कौशिक यांची शेवटची पोस्ट चर्चेत
सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे बोललं जात आहे. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर मुंबईला आणलं जाणार आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कौशिक हे गुरुग्राम या ठिकाणी एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडली. ते गाडीमध्ये बसलेले असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा : “४५ वर्षांच्या मैत्रीला…” सतीश कौशिक यांच्या अकाली निधनानंतर अनुपम खेर भावूक
दरम्यान सतीश कौशिक यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर त्यांनी अनेक चांगल्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. मिस्टर इंडिया, मोहब्बत, जलवा, राम लखन, जमाई राजा, अंदाज, मिस्टर और मिसेज खिलाड़ी, साजन चले ससुराल, दिवाना मस्ताना, परदेसी बाबू, बड़े मियां छोटे मियां, हसीना मान जाएगी, राजा जी, आ अब लौट चलें, हम आपके दिल में रहते हैं, चल मेरे भाई अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.