Actor Govinda Apologies Paparazzi : अभिनेता गोविंदाने माध्यम प्रतिनिधींची हात जोडून माफी मागितल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘मिसेस इंडिया क्वीन पेहचान मेरी सीझन ४’ (Mrs India Queen Pehchan Meri Season 4) च्या अंतिम सोहळ्यात गोविंदा प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाला होता. कार्यक्रम संपल्यानंतर इव्हेंटमधून बाहेर पडताना अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी गोविंदाचे बॉडीगार्ड आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. परिस्थिती अधिक चिघळत असल्याचे लक्षात येताच गोविंदा स्वतः पुढे आला आणि हात जोडून त्याने माध्यम प्रतिनिधींची माफी मागितली.

गोविंदाचे बॉडीगार्ड आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये धक्का-बुक्की

इव्हेंटच्या आवारामध्ये माध्यम प्रतिनिधी, पापाराझी आणि चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. अभिनेता गोविंदा बाहेर पडत असल्याचे दिसताच प्रत्येकाने त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. यावेळी गोविंदाचे बॉडीगार्ड असलेल्या टीमने गर्दीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. माध्यम प्रतिनिधी गोविंदाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी धक्काबुक्की होऊन गोंधळ उडाला. बॉडीगार्डने कॅमेरामन आणि पापाराझींना मागे ढकलले.

या झटापटीमध्ये ढकलल्यामुळे पत्रकार नाराज झाले आणि त्यांनी याचा जाब विचारला. अशी धक्काबुक्की का करत आहात? आम्हाला हात का लावला? असे म्हणत पत्रकार रोष व्यक्त करत होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच गोविंदाने मध्यस्थी केली आणि वातावरण शांत केले.

सोशल मीडियावर अभिनेता गोविंदा याने माध्यम प्रतिनिधींची माफी मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये गोविंदा नम्रपणे माध्यम प्रतिनिधींची माफी मागून त्याच्या बॉडीगार्डला समजवत आहे. हे सगळे माझे मित्रच आहेत, असे गोविंदाने बॉडीगार्डला सांगितले आहे. यावेळी इव्हेंटशी संबंधित इतर लोकदेखील उपस्थित असल्याचे दिसून आले. गर्दीमध्ये महिलादेखील असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. परिस्थिती सावरून घेत गोविंदाने केलेल्या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. गोविंदा नम्र असून त्याने जे केलं ते सध्या कोणतेच सेलिब्रिटी करत नाहीत अशी एकाने कमेंट केली आहे, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, सध्याच्या अभिनेत्यांमध्ये गोविंदासारखे गुण दिसून येत नाहीत.

घडलेल्या घटनेवर माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली आहे. सिक्युरिटी गार्ड अनेकदा अनावश्यक जोर लावून अधिक आक्रमक होत असतात. याची खरं तर काहीच गरज नसते. आम्ही आमचं काम करण्यासाठी या ठिकाणी येत असतो, त्यामुळे अशा प्रकारे धक्काबुक्की करणं योग्य नाही. मात्र, ही परिस्थिती अभिनेता गोविंदाने योग्य पद्धतीने हाताळली असल्याचे माध्यम प्रतिनिधींनी सांगितले.