Hrithik Roshan Post On Ranbir Kapoor’s Ramayan VFX : नुकतीच रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. टीझर व्हिडीओ रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर ‘रामायण’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. भव्य दृश्ये आणि संगीताचे काहींनी कौतुक केले असले तरी व्हीएफएक्स (VFX) बाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याचं कौतुक केलंय, तर काहींनी त्यावर थेट टीका केली आहे.

सोशल मीडियावरील या दोन्ही प्रतिक्रियांच्या चर्चा पाहून बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने व्हीएफएक्सकडे बघण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन आणि त्यामागील दिग्दर्शकाचा नेमका विचार काय असतो, याबद्दल आपलं मत मांडलं आहे.

हृतिकने पोस्टद्वारे मांडली आपली बाजू

हृतिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “हो, खराब व्हीएफएक्स नक्कीच असू शकतात. कधी कधी ती इतके वाईट असतात की, पाहतानाही त्रास होतो, विशेषतः जेव्हा मी स्वतः त्या चित्रपटाचा भाग असतो. मी ११ वर्षांचा असताना लंडनमध्ये ‘बॅक टू द फ्युचर’ चित्रपट पाहिला होता आणि त्या अनुभवानं माझं आयुष्य बदललं. मला त्याचं इतकं वेड लागलं की, मी माझ्या वडिलांच्या व्हीएचएस प्लेअरवर वारंवार पॉज अन् प्ले करून, त्यातील प्रत्येक फ्रेम्सचा अभ्यास करायचो.”

Award Banner

‘रामायण’चे उदाहरण देत तो पुढे म्हणाला, “आज आपल्यातील काही खास व्यक्ती, जसे की ‘कल्की २८९८ एडी’, ‘बाहुबली’, ‘रामायण’चे निर्माते (आणि अर्थातच ‘कोई मिल गया’ व ‘क्रिश’साठी माझे वडील) हे माझे हीरो आहेत. त्यांच्याकडे काहीतरी नवीन करण्याची दृष्टी आणि हिंमत आहे. केवळ सिनेमावरील प्रेमापोटी ते हा धोका पत्करतात, जेणेकरून प्रेक्षकांना काहीतरी अभूतपूर्व अनुभवायला मिळावे. माझ्या मते, त्यांनी इतका पैसा आणि आयुष्यातील अनेक वर्षे पणाला लावली आहेत, जेणेकरून आजच्या ११ वर्षांच्या मुलालाही तोच अनुभव घेता यावा, जो मी घेतला होता. हा उद्देश कौतुकास्पद आहे. मला माझ्या भारतीय सहकाऱ्यांचा अभिमान आहे. त्याचा भाग होण्यासाठी मी सहायक म्हणूनही काम करायला तयार आहे. पण ही पोस्ट माझ्याबद्दल नाही, तर प्रेक्षकांबद्दल आहे. व्हीएफएक्सवर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी हजारो कलाकार दिवस-रात्र मेहनत घेतात. त्यामुळे किमान आपण अधिक जागरूक राहून त्यांच्यावर टीका केली पाहिजे.”

अभिनेत्याने पुढे स्पष्ट केले, “व्हीएफएक्सच्या वेगवेगळ्या शैली असतात. कॉमिक्स किंवा ॲनिमेशनप्रमाणेच प्रत्येकाची पसंती वेगळी असू शकते. कोणाला ‘ॲनिमेशन’ शैली आवडते; तर कोणाला ‘स्पायडर-मॅन : इनटू द स्पायडर-वर्स’सारखी वास्तववादी शैली आवडते. एखादी शैली दुसऱ्यापेक्षा जास्त आवडणे ही वैयक्तिक निवड असू शकते; पण याचा अर्थ दुसरी शैली चुकीची आहे असा होत नाही. निर्मात्याने निवडलेली शैली तुम्हाला आवडली नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करणं चुकीचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी ‘व्हीएफएक्स खराब आहे’ म्हणण्यापूर्वी, तो निर्मात्याचा एक प्रयोग असू शकतो का याचा विचार करा. ‘हे वास्तववादी वाटते का?’ याऐवजी ‘हे कथेला साजेसं आहे का?’ किंवा ‘निर्मात्याला जे सुचवायचं आहे ते मला जाणवतंय का?’ असे प्रश्न स्वतःला विचारा आणि मगच त्यावर चर्चा करा.”

चाहत्यांच्या प्रश्नांना हृतिकने दिले उत्तर

एका चाहत्याने विचारले, “सर, तुमचा हा दृष्टिकोन खूप आवडला; पण सामान्य प्रेक्षक म्हणून व्हीएफएक्समधील वास्तववादापेक्षा त्यामागचा उद्देश आम्ही कसा समजावून घेऊ शकतो?” यावर हृतिक म्हणाला, “माझ्या मते, संपूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय कोणतंही मत बनवू नका. तोपर्यंत आपली प्रतिक्रिया व्यक्त करू नका.” पुढे दुसऱ्या एका चाहत्याने विचारले, “निर्मात्यांनी पोस्ट-प्रॉडक्शनसाठी अधिक वेळ दिला पाहिजे, असं तुम्हाला वाटत नाही का? कारण- अनेकदा अपूर्ण व्हीएफएक्सवर टीका होते. मग अर्धवट काम लोकांसमोर का आणलं जातं?” यावर अभिनेत्याने मिश्किलपणे उत्तर दिले, “हो, हे खरोखरच एक रहस्य आहे.”

‘रामायण’बद्दल हृतिक रोशनची पोस्ट

‘रामायण’बद्दल थोडक्यात सांगायचे तर…

दरम्यान, नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच रवी दुबे लक्ष्मण आणि सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहेत. प्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर आणि ए. आर. रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. येत्या ऑक्टोबर २०२६ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर ‘रामायण : भाग १’ जगभरात प्रदर्शित होणार आहे.