Meghna Malik Shares Nana Patekar Video : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. अभिनयाबरोबरच राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रांमध्येही त्यांचा दबदबा पाहायला मिळतो. ­­­

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे नाना पाटेकर त्यांच्या साधेपणानेसुद्धा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. अभिनय करण्याबरोबरच नाना पाटेकर हे उत्तम स्वयंपाकदेखील करतात. अशातच त्यांचा जेवण बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनेक कलाकारांनी नाना पाटेकरांनी बनवलेल्या जेवणाचे कौतुक केले आहे. नाना पाटेकरांनादेखील स्वत:च्या हातांनी जेवण बनवून सर्वांना खाऊ घालायला खूपच आवडतं. नाना पाटेकरांनी स्वत:सुद्धा एका मुलाखतीत सांगितले होते की, ते अभिनेते झाले नसते तर कदाचित ते उत्तम स्वयंपाकी असते.

Award Banner

अशातच नुकतेच एका अभिनेत्रीला नाना पाटेकरांनी स्वत:च्या हातांनी बनवून दिले. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर अभिनेत्रीसाठी चक्क स्वत:च्या हातांनी जेवण बनवत आहेत. ही अभिनेत्री म्हणजे मेघना मलिक.

अभिनेत्री मेघना मलिकसाठी नाना पाटेकरांनी बनवला खास पदार्थ

मेघना मलिकने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नाना पाटेकरांचा जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ती असे म्हणते, “हे आहेत नाना पाटेकरजी… एक उत्तम अभिनेते असण्याबरोबरच ते एक उत्तम स्वयंपाकीसुद्धा आहेत. एके दिवशी काही कारणास्तव शूटिंगवर रात्रीच्या जेवणाची सोय होऊ शकली नाही. पॅकअप झाल्यावर मी हॉटेलवर पोहोचले, तर तिथे नाना पाटेकर जेवत होते. मला भुकेनं व्याकुळ झालेलं बघून ते लगेच हॉटेलच्या किचनमध्ये गेले. स्वतःच्या घरचे काही खास मसाले घेतले, जे त्यांच्याबरोबर नेहमीच असतात आणि त्यांनी माझ्यासाठी स्वतःच्या हातांनी खिमा बनवला. नाना पाटेकर तुम्ही कमाल आहात.”

मेघनाने शेअर केला नाना पाटेकरांचा जेवण बनवतानाचा व्हिडीओ

नाना पाटेकरांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला नेटकरी आणि कलाकारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. कमेंट्समध्ये सर्वांनीच नाना पाटेकरांच्या या साधेपणाचे कौतुक केले आहे. जेवण बनवल्यानंतर नाना पाटेकर आणि मेघना यांनी मिळून जेवणाचा आस्वादही घेतला. मेघनाने दोघांचा एकत्र जेवण जेवतानाचा फोटोसुद्धा आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, मेघनाने शेअर केलेला हा व्हिडीओ ‘संकल्प’ या सीरिजच्या सेटवरील असावा. या सीरिजमध्ये नाना पाटेकर आणि मेघनाने एकत्र काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रेक्षकांकडून या सीरिजला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.