अभिनेते पंकज त्रिपाठी यांची पत्नी मृदुलाने लग्न करताना आलेल्या अडचणींबद्दल सांगितलं आहे. पंकज व मृदुला यांचे लग्न २००४ मध्ये झाले होते. लग्नाला २० वर्षे झाली असली तरी सासूबाईंनी अजूनही स्वीकारलं नाही, असा खुलासा मृदुला त्रिपाठीने केला आहे. त्याकाळी प्रेमविवाह करणे अजिबात सामान्य नव्हते. तसेच मृदुला म्हणाली की तिचे कुटुंब उच्च कुळातील होते, त्यामुळे लग्नाला विरोध झाला होता.
अतुल यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मृदुलाने सांगितलं की एका लग्नात तिने पहिल्यांदा पंकज यांना पाहिलं होतं. तिले ते आवडले आणि नंतर ते एकमेकांना भेटू लागले. तेव्हा मृदुला नववीत होती आणि पंकज ११वीत होते. दोघांनाही हे नातं लपवून ठेवावं लागलं होतं कारण त्यांच्याकडे मुला-मुलीने एकमेकांशी बोलणं किंवा एकमेकांकडे पाहणं चांगलं मानलं जात नव्हतं.
दोघांच्या नात्याबद्दल मृदुलाच्या आईला शंका येत होती, त्यामुळे तिने मृदुलाला सांगितलं की पंकजला ‘भैया’ (भाऊ) म्हणायचं. “मी त्यांना भाऊ म्हणणार नव्हते, त्यामुळे मी त्यांना पंकज‘जी’ म्हणू लागले. मात्र, ते खूप विचित्र वाटत होतं, म्हणून मी फक्त ‘जी’ म्हणू लागले,’ असं मृदुला म्हणाली. आता मृदुला पंकज यांना पती म्हणते.
कुटुंबियांनी अजूनही स्वीकारलेलं नाही – मृदुला त्रिपाठी
मृदुला म्हणाली, “आमचं नातं खूप वादग्रस्त राहिलंय, कारण आम्हाला अजूनही कुटुंबियांनी स्वीकारलेलं नाही. आम्ही रक्ताचे नातेवाईक नाही, पण आमच्याकडे एखाद्या उच्च कुळातील घरातील मुलीने खालच्या कुळातील मुलाशी लग्न करणे स्वीकारले जात नाही. त्यामुळेच आमच्या लग्नात खूप अडचणी आल्या. एकदा मी हिंमत एकवटून माझ्या वडिलांना पंकजबद्दल सांगितलं. मी म्हटलं, ‘मला पंकजशी लग्न करायचं आहे.’ त्यांची प्रतिक्रिया मला चकित करणारी होती. ते म्हणाले, ‘हे तू मला आधीच सांगायचं ना, मी उगाच तुझ्यासाठी मुलगा शोधण्यात वेळ घालवत होतो. मला थोडा वेळ दे, मी याबद्दल विचार करतो.”
आईला कळताच झाला गोंधळ – मृदुला त्रिपाठी
मृदुलाच्या वडिलांनी तिला म्हटलं की पंकजला लग्नाची मागणी घालायला सांग. नंतर त्यांनी मृदुलाच्या आईला सांगितलं. हे ऐकताच तिची आई भडकली. “घरात मोठा गोंधळ झाला. वहिनी खूश नव्हती, आई खूश नव्हती. पंकज माझी काळजी कशी घेईल याची तिला चिंता वाटत होती. पण हळुहळू त्यांनी आम्हाला स्वीकारायला सुरुवात केली,” असं मृदुला म्हणाली.
हेही वाचा – अमिताभ बच्चन-अभिषेक बच्चन यांनी मुलुंडमध्ये विकत घेतली १० अपार्टमेंट्स, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी
बरेच प्रयत्न केल्यानंतर दोन्ही कुटुंबे लग्नासाठी तयार झाली, मात्र पंकज यांच्या आईने आजपर्यंत सूनेला स्वीकारलेलं नाही. “माझ्या सासूबाईंनी आजपर्यंत मला स्वीकारलेलं नाही, याचे कारण मी आधी सांगितले तेच आहे. सांस्कृतिक फरकांमुळे आमच्या लग्नाबद्दल अजूनही त्यांच्या मनात नाराजी आहे,” असं मृदुला म्हणाली. पंकज व मृदुला यांना एक मुलगी आहे.