Paresh Rawal Praise Ranveer Singh Dhurandhar 2 : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्डस् मोडले आहेत.

‘धुरंधर २’ पाहून सामान्य प्रेक्षकांपासून ते बॉलीवूड अन् अनेक दाक्षिणात्य सुपरस्टार्सनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ‘पीटीआय’शी संवाद साधताना या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.

परेश रावल यांनी ‘धुरंधर २’चे केले कौतुक

परेश रावल यांनी याआधी आदित्य धरबरोबर ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’मध्ये काम केले आहे. त्यामुळे ‘धुरंधर’ या सुपरहिट फ्रँचायजीचाही भाग व्हायला त्यांना आवडले असते, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, “मी धुरंधर १ व २ दोन्ही चित्रपट पाहिले आहेत. पहिला भाग दोनदा पाहिला आणि दुसरा भाग एकदा पाहिला असून, मला तो पुन्हा पाहायचा आहे. मला वाटतं की, मी या चित्रपटात असायला हवे होते.”

Award Banner

“मी या चित्रपटात असतो, तर मजा आली असती”

परेश रावल यांनी ‘उरी’मध्ये अजित डोवाल यांच्यावर आधारित ‘गोविंद भारद्वाज’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर, ‘धुरंधर’मध्ये आर. माधवन यांनी अशाच प्रकारची भूमिका साकारली आहे. एकाच धाटणीच्या पात्राचे दोन वेगळे पैलू पाहणे रंजक असल्याचे सांगत परेश रावल म्हणाले, “मला ‘धुरंधर’ खूप आवडला. हा केवळ चित्रपट नसून एक महागाथा आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की, मी या चित्रपटात असतो, तर खूप मजा आली असती.”

परेश रावल यांनी केले आर. माधवनचे कौतुक

‘जागरण’ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी आर. माधवनने साकारलेल्या ‘अजय सन्याल’ या पात्राबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “अजित डोवाल आपल्या देशाचे खरे नायक आहेत आणि आर. माधवनसारख्या अभिनेत्याने त्यांचे प्रतिनिधित्व करणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याने केलेले काम अप्रतिम आहे.”

‘धुरंधर २’च्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, मीडिया रिपोर्टसनुसार, या सिनेमाने केवळ १८ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ आहे.

‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८ दिवस पूर्ण केले असून १००० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या १८ व्या दिवशी या चित्रपटाने २८.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. १७ व्या दिवशी चित्रपटाने २५.६५ कोटींची कमाई केली होती, त्या तुलनेत १८ व्या दिवशी कमाईत १२.१ टक्क्यांची वाढ झाली आहे.