Prakash Raj Responds To Trollers : बॉलीवूड, तसेच दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आई, स्वर्णलता यांचं सोमवारी (३० मार्च) रोजी निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

प्रकाश राज यांच्या आईवर चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे काही फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आले. हे फोटो समोर आल्यानंतर प्रकाश राज यांच्यावर आता टीका होत आहे. या टीकेवर आता प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत उत्तर दिलं आहे.

प्रकाश राज यांच्या आईवरील अंत्यसंस्काराचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर काहींनी प्रकाश राज यांच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करीत त्यांना लक्ष्य केले. प्रकाश राज यांनी स्वतःला ‘नास्तिक’ (देवावर विश्वास नसणारा), असे म्हटले होते. मग ते आईच्या अंत्यसंस्कारासाठी चर्चमध्ये कसे गेले, असा सवाल करीत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.

Award Banner

त्यावर संताप व्यक्त करत प्रकाश राज यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर लिहिले, “हो, माझा देवावर विश्वास नाही… पण माझ्या आईचा देवावर विश्वास होता. तिच्या श्रद्धेनुसार तिचे अंत्यसंस्कार होण्याचा हक्क नाकारणारा मी कोण? हा एकमेकांबद्दलचा आदर आहे, जो आपण राखला पाहिजे. द्वेष पसरवणाऱ्या राक्षसांना हे कधी समजेल का?”

प्रकाश राज यांनी नास्तिक असण्याबाबत काय म्हटले होते?

ज्या व्हिडीओवरून प्रकाश राज यांना ट्रोल केले जात आहे, तो व्हिडीओ गेल्या वर्षीच्या एका मुलाखतीतील आहे. त्यात ते म्हणाले होते, “माझा देवावर विश्वास नाही. देव आहे हे सांगण्यासाठी फक्त श्रद्धा पुरेशी असते; पण देव नाही हे सिद्ध करण्यासाठी खूप ज्ञानाची गरज असते. माझ्याकडे त्यासाठी वेळ नाही. माझ्या पत्नीची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे; तर माझी आई ख्रिश्चन धर्माचे पालन करते. जोपर्यंत कोणी धर्माच्या नावाखाली दुसऱ्याचा छळ करत नाही किंवा आपलाच देव श्रेष्ठ आहे, असे सांगून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत मला कोणाच्या श्रद्धेची अडचण नाही.”

प्रकाश राज यांनी ट्रोलर्सना उत्तर देत शेअर केली पोस्ट

दरम्यान, प्रकाश राज यांनी आपल्या आईच्या निधनानंतर तिचा एक जुना फोटो शेअर करीत सर्वांच्या सांत्वनाबद्दल आभार मानले. “प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू अम्मा… तुझी खूप आठवण येईल,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, २०१८ मध्ये एका कार्यक्रमात प्रकाश राज यांनी सांगितले होते की, आईच्या मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती; मात्र त्यानंतर त्यांची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती, ज्यामुळे त्या आपल्या कुटुंबालाही ओळखू शकत नव्हत्या. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. अशातच त्यांची प्राणज्योत मालवली.