अभिनेता राजेश कुमारने आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलंय. पण २०१७ मध्ये त्याने अभिनय सोडला होता. तो मुंबई सोडून बिहारमधील गया इथे आपल्या मूळ गावी शेती करू लाला. त्याचा हा निर्णय ऐकून अनेकांन धक्का बसला होता. पण त्याने हा निर्णय अध्यात्मिक गुरु सद्गुरू (जग्गी वासुदेव) यांच्या सल्ल्यानंतर घेतला होता. राजेशला शेतीतून फायदा नव्हे तर प्रचंड नुकसान झालं आणि पाच वर्षांत त्याच्यावर २ कोटींचं कर्ज झालं. त्याच्याकडे उत्पन्नाचं कोणतेही स्थिर साधन नव्हतं. एक वेळ तर अशी आली की त्याने स्वतःच्या मुलाच्या शाळेबाहेर भाज्याही विकल्या. पण या परिस्थितीबद्दल आपल्याला कधीही नैराश्य किंवा राग आला नाही आणि ते अपयश नव्हतं, असं राजेश कुमार सांगतो.

राजेश कुमारच्या मते, तो आधीपासून सद्गुरूंचा अनुयायी नव्हता, पण नंतर झाला. त्याने ईशा फाऊंडेशनसाठी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले. सद्गुरूंच्या शब्दांचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला आणि त्याने सर्व काही सोडून बागायती शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. ‘द मिस्टिक वर्ल्ड’शी बोलताना राजेश कुमारने सद्गुरूंच्या ‘रॅली फॉर रिव्हर्स’ मोहिमेचा उल्लेख केला. “या रॅलीदरम्यान सद्गुरू सतत एक गोष्ट सांगत होते, ‘मला तुमच्या राज्यातील १०० तरुण द्या, मी शेतीचे स्वरूप बदलून दाखवेन. पण तीन वर्षे मला विचारू नका की माझ्या भविष्याचं काय?’ जेव्हा मी माझ्या गावी पोहोचलो, तेव्हा मला अचानक त्या वाक्याचा अर्थ गवसला.”

मी शेतकरी म्हणून अपयशी ठरलो – राजेश कुमार

राजेशच्या मते, त्याला शेतीची माहिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजल्यानंतर स्वतः शेती करायचं ठरवलं. “मला जाणवलं की शेतकऱ्यांना कीटकनाशकं वापरू नका असं सांगण्यापेक्षा, शेतात उतरून मूळ समस्या काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी शेतकरी झालो. मी बागायती शेतीचा प्रयत्न केला आणि त्यात मी वाईटरित्या अपयशी ठरलो. पण सद्गुरूंच्या कृपेमुळे मी याला अपयश म्हणणार नाही. मला याचं आता काही वाटत नाही, कारण मला याला यश किंवा अपयशाचा टॅग लावायचा नाही. यातून मला खूप काही शिकायला मिळालं, जे इतरत्र शिकता आलं नसते.”

राजेश कुमारचा ५ वर्षांचा शेतीचा प्रवास

राजेश कुमारला शेती, जमीन आणि माती समजून घेण्यासाठी तब्बल पाच वर्षे लागली. मात्र, या प्रवासात एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. “मी रोपं लावली आणि तब्बल ३५ वर्षांनंतर त्या भागात भीषण महापूर आला आणि सगळं वाहून गेलं.” तरीही राजेशने हार न मानता पुन्हा १५,००० झाडे लावली, पण करोना काळात सर्व प्रयत्न वाया गेले. त्याने पुन्हा झाडे लावली, पण यावेळी पाणीटंचाईचा फटका बसला. “हा माझा शेवटचा प्रयत्न होता. माझ्याकडे जे काही पैसे उरले होते, त्यातून मी विहिरीसाठी ५०० फूट खोल ड्रिलिंग केले, पण पाण्याचा एक थेंबही लागला नाही. या सर्व गोष्टी एकाच वेळी घडत होत्या,” असं राजेश कुमारने सांगितलं.

अध्यात्मामुळे शांत राहण्यास मदत झाली – राजेश कुमार

पैसे गमावूनही आणि सतत अपयश येऊनही, अध्यात्मामुळे या कठीण काळात शांत राहण्यास मदत झाली, असं राजेश कुमारने सांगितलं. “अध्यात्मामुळे मला कधीही काळजी, नैराश्य, संताप किंवा चिडचिड या गोष्टी जाणवल्या नाहीत. काहीच घडत नव्हतं आणि ते मला दिसत होतं, तरीही माझे प्रयत्न थांबले नाही. हेच अध्यात्म आहे.”

राजेश कुमारवर २ कोटींचे कर्ज

शेती करण्याच्या प्रयत्नात २ कोटींचं कर्ज राजेश कुमारवर झालं. तो दिवाळखोर झाला. शेवटी त्याने अभिनयात परतायचं ठरवलं. ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या एका मुलाखतीत राजेशने सांगितलं की, “आता हे कर्ज कमी होऊन २० लाख रुपयांवर आलंय. मी त्या आर्थिक चक्रातून बाहेर पडलो आहे. आता फक्त १० ते १५ टक्के कर्ज उरले आहे.”

राजेश कुमार गाजलेली मालिका ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मधील ‘रोशेष’ या भूमिकेसाठी ओळखला जातो. त्याचबरोबर अलीकडे त्याने ‘सैयारा’, ‘है जवानी तो इश्क होना है’, ‘ओ माय डॉग’ आणि ‘निशांची’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.