Actor Rakesh Bedi Talk About Dhurandhar 3 : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाची गेले काही दिवस सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेल्यावर्षी म्हणजेच, २०२५ मधील डिसेंबरमध्ये ‘धुरंधर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर यावर्षी (मार्च २०२६) ‘धुरंधर’चा दुसरा भाग प्रदर्शित झाला. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ नंतर आता सर्वत्र ‘धुरंधर’चा पुढील भाग म्हणजेच ‘धुरंधर ३’ येणार असल्याचीसुद्धा चर्चा सुरू आहे. ‘धुरंधर’च्या फ्रेंचायझीचा पुढील भागसुद्धा यावा, अशी इच्छा चाहते करत आहेत. या चर्चांवर चित्रपटातील मुख्य अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
‘धुरंधर’ चित्रपटात ‘जमील जमाली’ची भूमिका साकारून प्रेक्षकांची पसंती मिळवणारे अभिनेते राकेश बेदी यांनी ‘धुरंधर ३’ बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. एका मुलाखतीदरम्यान राकेश बेदी यांनी या चित्रपटाच्या यशाबद्दल आणि तिसऱ्या भागाच्या शक्यतेबद्दल आपलं मत व्यक्त केलं.
‘धुरंधर २’ च्या यशानंतर चाहते सातत्याने तिसऱ्या भागाची मागणी करत आहेत. यावर राकेश बेदी म्हणाले, “मला वाटत नाही की, या चित्रपटाचा तिसरा भाग येईल. पण ‘धुरंधर’ ही एक मोठी फ्रेंचायझी आहे, त्यामुळे भविष्यात इतर कलाकारांना घेऊन हा चित्रपट कधीही बनवला जाऊ शकतो. ‘धुरंधर २’च्या शेवटी गुप्तहेर (रणवीर सिंह) मायदेशी परततो आणि कथा संपते.”
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, यावेळी राकेश बेदी यांनी जमील जमाली या पात्राबद्दलही आपले मत व्यक्त केले. हे पात्र पाकिस्तानात काम करणारा एक भारतीय गुप्तहेर असल्याचे शेवटी समोर येते. या ट्विस्टबद्दल ते म्हणाले, “प्रेक्षकांसाठी हा एक मोठा धक्का होता, पण आमच्यासाठी तो फक्त एक सीन होता. आम्हाला माहित होतं की, याचा प्रभाव पडणार आहे.”
“‘धुरंधर’चा पहिला भाग सुपरहिट झाल्यामुळे प्रेक्षकांचा दुसऱ्या भागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता. प्रेक्षक हा सिनेमा फक्त पाहण्यासाठी नाही, तर तो उत्तमच असणार या खात्रीने चित्रपटगृहात आले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत”, असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ने सुमारे १,३०० कोटी रुपये कमावले होते. तर मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या दुसऱ्या भागाने अनेक विक्रम मोडले. भारतात १,१०० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला असून, आतापर्यंत चित्रपटाने जगभरात १,७०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंह एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रणवीरबरोबरच अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, संजय दत्त, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या दोन्ही चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर आता तिसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? हे आता आगामी काळातच समोर येईल.
