Randeep Hooda blessed with a baby girl: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा ५० व्या वर्षी बाबा झाला आहे. रणदीपची पत्नी अभिनेत्री लिन लैशराम हिची आज मंगळवारी (१० मार्च २०२६) प्रसूती झाली. रणदीपने बाळाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
रणदीप हुड्डा व लिन लैशराम यांनी लग्नानंतर अडीच वर्षांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. लिनने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रणदीपने आपल्या चिमुकल्या लेकीचा व वडिलांचा एक फोटो पोस्ट केला आहे. रणदीपच्या वडिलांच्या दिवशीच त्यांच्या लेकीचा जन्म झाला, त्यामुळे हुड्डा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
एका फोटोत रणदीपच्या वडिलांनी नातीला कवेत घेतलंय. तर दुसऱ्या फोटोत चिमुकलीचा हात दिसतोय. “आजोबा व नातीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. बाबा, आज मी बाबा झाल्यानंतर माझ्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिन, मला बाबा बनवल्याबद्दल आणि आपल्या छोट्या मुलीला या जगात आणल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. एक चिमुकली मुलगी आणि आयुष्यभराचं प्रेम,” असं रणदीप हुड्डाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
पाहा रणदीप हुड्डाची पोस्ट
रणदीपने ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सर्वजण रणदीप व लिनला शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न केलं होतं. त्यांचं लग्न मणिपूरमधील इम्फाळ येथे झालं. त्यांनी मणिपुरी परंपरेनुसार, म्हणजेच ‘मेइतेई’ पद्धतीने विवाह केला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. हे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलं होतं. लग्नासाठी रणदीप हुड्डाने पारंपरिक मणिपुरी पोशाख परिधान केला होता, तर लिनने ‘पोटलोई’ हा पारंपारिक मणिपुरी पोषाख घातला होता.
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी रणदीप हुड्डाने पोस्ट करून तो व लिन लवकरच पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत, असं सांगितलं होतं. लिनने बेबी बंपबरोबरचे अनेक फोटो पोस्ट केले होते. रणदीप हुड्डाने कालच मॅटर्निटी फोटोशूटमधील त्याचे व लिनचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. त्यानंतर आज लिनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
