बाप आणि लेकीचं नातं हे जगातल्या सर्वात सुंदर आणि हळव्या नात्यांपैकी एक मानलं जातं. प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा तिचा पहिला सुपरहिरो असतो. मुलगी कितीही मोठी झाली किंवा सातासमुद्रापार शिक्षणाला गेली, तरी बाबासाठी ती लहानच असते. जर लेक घरी नसेल तर बाबाला चैन पडत नाही. असंच काहिसं अभिनेता रोहित रॉयच्या बाबतीत घडलं होतं. रोहितची मुलगी कियारा अमेरिकेत शिकत होती. त्याला लेकीची खूप आठवण येत होती, त्यामुळे त्याने थेट तिला भेटून सरप्राइज द्यायचं ठरवलं. त्या सरप्राइजचा किस्सा रोहित रॉयने सांगितला होता.
“मी माझ्या मुलीला सरप्राईज देण्यासाठी अमेरिकेला गेलो होतो. मी तिच्या रूमच्या दारात पोहोचलो. मला वाटतं त्यादिवशी रविवार होता. सकाळीच मी पोहोचलो, तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ‘तू खरंच इथे आहेस का?’ तिला वाटलं की तिला भास होत आहे असं समजून ती रडू लागली,” असं रोहित रॉय एका मुलाखतीत म्हणाला होता.
तिकीट काढलं अन् अमेरिकेला पोहोचला रोहित रॉय
रोहितची मुलगी कियारा अभ्यासात खूप हुशार आहे. अलिकडेच तिने तिचं शिक्षण पूर्ण केलंय. ती ब्राऊन युनिव्हर्सिटीत शेवटच्या वर्षात शिकत असताना रोहित तिला भेटायला गेला होता. “मला तिची फार आठवण येत होती. कोणताही बाबा भावना व्यक्त करत नाही, कारण आम्हाला काय वाटतं ते आम्ही कोणालाही काहीही सांगू शकत नाही. मी विचार केला, ‘काय करू?’ मग मी तिकीट काढलं आणि तिला भेटायला गेलो. मी एकटाच होतो. मानसीही (रोहितची पत्नी) काहीच बोलली नाही. मी रात्री पोहोचलो आणि सकाळी टॅक्सी बूक करून तिच्याजवळ गेलो. आम्ही बापलेक सात दिवस एकत्र राहिलो. असे दिवस मी कधीच घालवलेले नाहीत. तो क्षण रेकॉर्ड करण्यासाठी माझ्याकडे कोणीच नव्हतं याची खंत वाटते,” असं रोहित रॉय म्हणाला होता.
…तर माझा २० तासांचा प्रवास वाया गेला असता
रोहितला मुलीबरोबरच्या भेटीचे काही क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचे होते, पण नंतर त्याने तो विचार बदलला. “मला वाटलं हल्ली मुलं काहीही बोलतात आणि ती काही बोलली असती तर? माझा संपूर्ण २० तासांचा प्रवास वाया गेला असता. कियाराला जास्त फोटो आणि व्हिडिओ काढायला आवडत नाहीत,” असं रोहितने सांगितलं. तो क्षण रेकॉर्ड केला नसला, तरीही आयुष्यभर आठवणीत राहिल असा मनावर कोरला गेलाय, असं रोहितने नमूद केलं.
दरम्यान, रोहितच्या मुलीला झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ची ऑफर देण्यात आली होती, परंतु शिक्षण पूर्ण करायचं असल्याने तिने नकार दिला. “दीड वर्षापूर्वी मी शबाना आझमी यांनी आयोजित केलेल्या फॅशन इव्हेंटला गेलो होतो. तिथे बरेच स्टार्स होते. त्यानंतर मला आर्चीजसाठी फोन केला होता. मी त्यांना सांगितलं की ती शिकतेय, तरीही तिला सिनेमा करायचा असेल तर तिला विचारतो. पण तिने नकार दिला. तिला जर शिक्षण पूर्ण करून या क्षेत्रात यायचं असेल तर आमचा पूर्ण पाठिंबा असेल,” असं रोहित रॉयने सांगितलं.
