अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’मधून बाहेर पडल्याने सगळेच चाहते चांगले नाराज झाले आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान आपल्याला काही गोष्ट पटल्या नाहीत म्हणून त्यातून बाहेर पडल्याचं अक्षयने कबूल केलं तर काही लोक अक्षयच्या मानधनामुळे त्याला चित्रपट सोडावा लागला असं म्हणत आहेत. ‘हेरा फेरी’ यातील शाम, बाबुराव आणि राजू ही जोडी प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे.
या नवीन भागात बाबुराव आणि शाम म्हणजेच परेश रावल आणि सुनील शेट्टी दिसणार आहेत, पण राजूची भूमिका अभिनेता कार्तिक आर्यन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकतंच याविषयी सुनील शेट्टीनेही मौन सोडलं आहे. अक्षयच्या अचानक चित्रपटातून बाहेर पडल्याने त्यालाही धक्काच बसला आहे. मीडियाशी संवाद साधतांना त्याने यावर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : ‘दृश्यम २’चे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांची बॉलिवूडच्या रिमेक पद्धतीवर टीका; म्हणाले “नुसतं फ्रेम टू फ्रेम…”
‘मिड डे’शी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणतो, “सगळंकाही सुरळीत सुरू होतं. पण अचानक अक्षय यातून बाहेर का पडला यामागचं कारण मलाही अजून नीट समजलेलं नाही. माझ्या ‘धारावी बँक’चं प्रमोशन संपलं की मी फिरोजशी बसून बोलून हे यामागील कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. अक्षय, परेश आणि मी आम्ही तिघेही या सीरिजसाठी सदैव उत्सुक होतो. अक्षयच्या अचानक बाहेर जाण्याने मीसुद्धा सुन्न झालो आहे.”
अक्षयच्या या चित्रपटातून बाहेर पडण्याने चित्रपटाचे चाहते चांगलेच नाराज आहे. या तिघांशिवाय हा चित्रपट बनूच शकत नाही आणि बनला तरी तो आम्ही बघणार नाही असा पवित्रा प्रेक्षकांनी घेतला आहे. अजूनतरी या सगळ्या गोष्टी चर्चेपुरत्याच मर्यादित आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी यावर अजूनही अधिकृत भाष्य केलेलं नाही.