Varun Dhawan On Underworld Threat Calls : ९० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टी आणि मुंबईतील अंडरवर्ल्ड यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्या काळात अनेक निर्माते आणि कलाकारांना धमकीचे फोन येत असत. शाहरुख खान, राकेश रोशन, करण जोहरसह अनेकांनी याआधी आलेल्या अशा धमकीच्या फोन कॉल्सबद्दलची माहिती दिली आहे.
अशातच नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेता वरुण धवननंही त्याच्या कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या अशाच एका धक्कादायक प्रसंगाची आठवण सांगितली. वरुणनं सांगितलं की, त्या काळात त्यांच्या घरी अंडरवर्ल्डकडून अनेक फोन येत होते. सुरुवातीला त्यांना त्याचं गांभीर्य समजलं नाही. त्यामुळे त्यांना स्वतःचं घर सोडून दुसरीकडे राहावं लागलं होतं.
वरुण धवनला अंडरवर्ल्डकडून येत होत्या धमक्या
वरुणनं युवा यूट्यूब चॅनेलशी साधलेल्या संवादात सांगितलं की, त्या काळात अनेक कलाकारांना अंडरवर्ल्डकडून फोन येत होते. त्याबद्दल तो म्हणाला, “त्यांच्या घरी अंडरवर्ल्डकडून अनेक फोन येत होते; पण सुरुवातीला आम्हाला त्याचं गांभीर्य समजलं नाही. आमच्या घरातील स्टाफच त्या लोकांशी फोनवर वाद घालत होते. स्टाफने तर आमचा पूर्ण पत्तादेखील दिला आणि त्यांना गार्डनमध्ये येऊन भेटायला सांगितलं. अगदी मारहाणीची भाषा वापरली.”
धमक्यांमुळे राहतं घर सोडावं लागलं अन्…
पुढे वरुणनं सांगितलं की, परिस्थिती खूपच बिघडल्यानंतर एका अभिनेत्यानं त्याच्या वडिलांना, (दिग्दर्शक डेविड धवन) फोन करून सावध केले. त्याबद्दल वरुण म्हणाला, “त्यानं सांगितलं की, प्रकरण हाताबाहेर गेलं आहे आणि समोरचा माणूस बंदूक घेऊन येण्याची धमकी देत आहे. त्याला आमचा पत्ता आणि ऑफिसची वेळ माहीत आहे. त्यावर बाबांनी विचारलं की, हे कोणी केलं, तेव्हा स्टाफमधल्या एका व्यक्तीचं नाव समोर आलं. त्यामुळे आम्हाला त्या दिवशी घर सोडून दुसरीकडे राहावं लागलं. त्या काळी परिस्थिती अतिशय भीतीदायक होती.”
दरम्यान, वरुण हा बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो अलीकडेच ‘बॉर्डर २’ चित्रपटात दिसला होता. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ व अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटानं जगभरात ४५० कोटी रुपयांची कमाई करीत बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले.
लवकरच वरुण धवन दिसणार ‘या’ चित्रपटात
आता वरुण लवकरच ‘है जवानी तो इश्क होना है’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर पूजा हेगडे, मृणाल ठाकूर, मौनी रॉय व रोहित सराफ आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसतील.
