बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २.१४ लाख मताधिक्याने विजयी साकारला. अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झाल्यावर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्यामुळे ही मतदान प्रतक्रिया पार पडली, आणि सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्य मिळविलं.
बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. यापूर्वी अजित पवार यांनी याच मतदारसंघातून १ लाख ६५ हजार मताधिक्यांचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी पोटनिवडणुकीच्या निकालात २ लाख १४ हजार ९३ मताधिक्याने विजयी साकारला. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली….हा ऐतिहासिक विजय आहे. या निकालानंतर बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने सुनेत्रा पवार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे, विवेकने या पोस्टच्या शेवटी मराठीत एक ओळ देखील लिहिली आहे.
विवेक ओबेरॉयची पोस्ट
“सुनेत्रा वहिनी, अजित दादांचं अस्तित्व, त्यांचं नाव… त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक बारामतीकरांच्या मनात कायम राहणार…बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तुम्ही जो ऐतिहासिक विजय नोंदवला आहे… ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. दादांनी राबवलेले विविध उपक्रम, त्यांचं सामान्य लोकांवर असलेलं प्रेम आणि त्यांची जिद्द यामुळेच ते खरे ‘लोकनेते’ म्हणून ओळखले जात होते; आणि आज त्यांच्या अर्धांगिनीवर जनतेने दाखवलेला विश्वास हेच सिद्ध करतो की, त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी तुम्हीच योग्य वारसदार आहात. तुम्हाला या नव्या प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा! महाराष्ट्रासाठी हा नक्कीच सुवर्णकाळ ठरेल… कारण, “सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!” असं विवेकने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बारामतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयाचा जल्लोष नको, कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये.’ असं आवाहन दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना केलं होतं. “आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
