रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा भव्य आणि प्रेरणादायी अनुभव घेता येईल. ‘राजा शिवाजी’ सिनेमाची पहिली झलक थिएटरमध्ये ‘धुरंधर २’च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रदर्शित करण्यात आली होती. आता रितेशने सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.

‘राजा शिवाजी’ सिनेमाची पहिली झलक समोर येताच सर्वांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. टीझर प्रदर्शित झाल्यावर अनेक बॉलीवूड कलाकारांनी पोस्ट शेअर करत रितेशसह संपूर्ण टीमचं भरभरून कौतुक केलं आहे. नुकतीच ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल विवेक ओबेरॉयने खास पोस्ट लिहिली आहे.

विवेक ओबेरॉय लिहितो, “राजा शिवाजी’ सिनेमाबद्दलची प्रत्येक गोष्ट थेट माझ्या मनाला येऊन भिडते. अर्थात, यासाठी मी आपल्या सर्वांचे भाऊ… रितेश देशमुखचं कौतुक करतो. पण, याचबरोबर सिनेमाबद्दलची प्रत्येक गोष्ट मला इतकी भावतेय याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, आपल्या सगळ्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला आदर! महाराजांच्या शौर्यगाथा ऐकत आपण मोठे झालो आहोत, आणि आता हा इतिहास आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. रितेश भाऊ…यासाठी तुमचं खरंच खूप कौतुक. कारण विलासराव देशमुख यांच्यासारख्या महान नेत्याचा मुलगा म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याप्रती असलेली तुमची निष्ठा…ही वारसा आणि कर्तव्य यांचा सुंदर संगम आहे.”

Award Banner

“रितेश भाऊ यानिमित्ताने तुम्ही, तुमचे वडील विलासराव देशमुखांची महाराष्ट्राच्या मातीप्रती असलेली निष्ठा आणि भक्ती पुढे नेत आहात. आज या सिनेमातून तुम्हाला भव्य पडद्यावर पाहणं ही माझ्यासाठी सुद्धा सन्मानाची गोष्ट आहे. जिनिलीया यामध्ये महाराणी सईबाईंची भूमिका साकारणार आहे…जिनिलीया तुम्ही सुद्धा या संपूर्ण प्रोजेक्टचा महत्त्वाचा भाग आहात; ज्यामुळे आताच्या काळात ‘७०मिमी’च्या पडद्यावर साकारलेलं हे स्वराज्याचं स्वप्न वास्तवात साकार झालं. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा!” असं विवेकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

riteish dehmukh raja shivaji movie
विवेक ओबेरॉयने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं केलं कौतुक

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. रितेश देशमुख यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर, त्याची पत्नी जिनिलीया देशमुख या सिनेमात सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे.