Actors who played Lord Ram before Ranbir Kapoor : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच आता त्याच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या अभिनेत्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. रणबीर या चित्रपटातून प्रभू श्री रामांच्या भूमिकेतून झळकणार आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित व नमित मल्होत्रा निर्मित रणबीरचा या चित्रपटाच्या टीझरमधील लूकसुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि नेटकरी याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. रणबीरला श्रीरामांच्या भूमिकेत बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का मनोरंजनविश्वात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी रणबीरपूर्वी प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे आणि लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये कोणत्या अभिनेत्यांचा समावेश आहे जाणून घेऊयात…

रणबीर कपूरआधी ‘या’ अभिनेत्यांनी साकारलेली श्रीरामांची भूमिका

अरुण गोविल – अरुण गोविल त्या अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जणू घर केलं. त्यांनी त्यांच्या अभिनयशैलीनं अनेकांची मनं जिंकली. तर या भूमिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये त्यांनी श्रीरामांची भूमिका साकारलेली. तर आता रणबीर कपूर श्रीरामांची भूमिका साकारत असलेल्या चित्रपटात ते राजा दशरथ यांची भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या पडद्यावर वेगळ्या भूमिकेतून बघणं रंजक ठरेल.

Award Banner

प्रभास – दाक्षिणात्य अभिनेता प्रभास ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात श्रीरामांच्या भूमिकेतून झळकलेला. यामध्ये त्याच्यासह बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन हिनं सीतेची भूमिका साकारलेली. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. तर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चित्रपटावर टीकासुद्धा केली होती.

गुरमीत चौधरी – हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरीनंसुद्धा २००९मधील ‘रामायण’ या मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारलेली. त्याच्याबरोबर त्याची पत्नी अभिनेत्री देबिना बॅनर्जी सीतेच्या भूमिकेत झळकलेली. दोघांची जोडी खूप लोकप्रिय ठरली होती.

एनटी रामा राव – दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते एनटी रामा राव यांनी १९५८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संपूर्ण रामायण’ या तमिळ चित्रपटात श्रीरामांची भूमिका साकारली होती. यामधून त्यांनी त्यांच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली होती.

ज्युनियर एनटीआर – ज्युनियर एनटीआरनंसुद्धा त्याचे सुपरस्टार आजोबा एनटी रामा राव यांच्याप्रमाणे प्रभू श्रीरामांची भूमिका साकारलेली. त्यानं १९९७मध्ये आलेल्या ‘बाला रामायण’ चित्रपटात ही भूमिका साकारलेली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.