Ameesha Patel Emotional Reaction : धर्मेंद्र यांच्या निधनानं संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोमवार (२४ नोव्हेंबर) रोजी धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त आलं आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या निधनानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्वांनीच आपल्या भावूक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांच्याबरोबरचे फोटो शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशातच अभिनेत्री अमीषा पटेलनंही तिच्या दु:खद भावना व्यक्त केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र रुग्णालयात दाखल असताना, देओल कुटुंबाला भेटण्यासाठी अमीषा रुग्णालयात गेली होती. न्यूज 18 शी बोलताना अमीषाने सांगितलं की, धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तिने अद्याप देओल कुटुंबाशी संपर्क साधलेला नाही. ती म्हणाली, “कुटुंब आधीच खूप भावनिक तणावाखाली आहे, त्यांना अजून त्रास द्यावा असं मला वाटत नाही. घरी इतके लोक भेटायला येत आहेत, सतत फोन येत आहेत… त्यामुळे आत्ताच त्यांना संपर्क करणं योग्य वाटत नाही.”

देओल कुटुंबाला या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोपनीयता आणि शांतता आवश्यक असल्याचं सांगितलं. तसंच तिनं न्यूयॉर्कहून भारतात परतल्यावर देओल कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचंही म्हटलं. या महिन्याच्या सुरुवातीला धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा आणि अमीषा पटेलसह काही कलाकारांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.

Award Banner

या भेटीबद्दल अमीषा म्हणाली, “तेव्हाची परिस्थिती खूप तणावाची होती. त्यावेळीही त्यांना एकांताची गरज होती. तेव्हाही त्यांची प्रकृती खूप नाजूक होती. शाहरुख, सलमान किंवा मी… आम्ही फक्त दहा मिनिटांसाठी सनीला मिठी मारायला तिथे थांबलो होतो. त्या क्षणी सनी आपलं दु:ख लपवू शकत नव्हता, कारण हा त्याच्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीचा प्रश्न होता.”

या संवादादरम्यान, अमीषाने धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या तिच्या नात्याबद्दलही सांगितलं. ‘विजेता’ फिल्म्स या धर्मेंद्र यांच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत ‘समा’ नावाच्या चित्रपटातून ती पदार्पण करणार होती. पण, तो चित्रपट कधीच बनू शकला नाही. याबद्दल ती म्हणाली, “तेव्हा माझं धरमजींसह खूप बोलणं व्हायचं. ते मला नेहमी त्यांच्या कुटुंबाचा भाग मानायचे. ते हसून म्हणायचे, ‘अमीषा मेरे घर की बेटी है.”

अमीषा पटेल इन्स्टाग्राम पोस्ट

पुढे धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल बोलताना अमीषा भावूक होत म्हणाली, “भारतीय सिनेसृष्टीने केवळ एक महान अभिनेता गमावलेला नाही, तर सर्वात देखणं आणि उदार मनाचं व्यक्तिमत्त्वही गमावलं आहे. नाव, प्रसिद्धी, स्टारडम – हे अनेकांना मिळतं. पण, जेव्हा तुम्ही असा वारसा मागे ठेवता की ज्यामुळे लोकांना तुमची मनापासून आठवण येते, तेच मोठं यश असतं. धर्मेंद्र यांच्या निधनानं प्रत्येकाच्या हृदयात कधीही भरून न येणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.”