Actress Ananya Raj Passes Away: बॉलीवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राज हिचं निधन झालं आहे. ती ३५ वर्षांची होती. अनन्याने एका महिन्यापूर्वी अखेरचा श्वास घेतला, पण तिच्या कुटुंबाने ही बातमी जाहीर केली नव्हती. निधनाला एक महिना पूर्ण झाल्यावर कुटुंबियांनी अनन्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट करून ही दुःखद बातमी सर्वांना सांगितली.
अनन्या राजच्या कुटुंबाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “आम्ही अनन्याचे कुटुंबीय आहोत. आम्हाला सांगताना अत्यंत दुःख होतंय की, १५ जुलै रोजी सकाळी अनन्याचं निधन झालं. झोपेतच तिने शांतपणे अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून ती शारीरिक आणि मानसिक समस्यांशी झुंज देत होती. एका योद्ध्याप्रमाणे तिने या परिस्थितीचा सामना केला.”
कुटुंबाने पुढे लिहिलं, “ती अत्यंत खंबीर विचारांची मुलगी होती आणि राणीसारखी जगली. बाळा, तुझी उणीव आम्हाला नेहमी भासेल. आम्ही तुम्हा सर्वांना तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो. या कठीण काळात आम्हाला आमची प्रायव्हसी जपा,” अशीही विनंती त्यांनी केली. कमेंट सेक्शनमध्ये चाहते अनन्या श्रद्धांजली वाहत आहेत.
कोण होती अनन्या राज?
अनन्या राजचा जन्म १९९१ सालचा. ती मुंबईत लहानाची मोठी झाली. अनन्या बॉलीवूडमधील एक नवोदित अभिनेत्री होती. तिने २०१६ मध्ये आलेल्या ‘७ आवर्स टू गो’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती २०१७ मधील ‘द फायनल एक्झिट’ या चित्रपटात दिसली. २०१९ मध्ये आलेल्या विक्रम भट्ट यांच्या ‘घोस्ट’ या हॉरर चित्रपटातही तिने काम केलं होतं. त्याचबरोबर अनन्याने काही वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्मसही केल्या होत्या.
अनन्या राजचा दाक्षिणात्य चित्रपट
अनन्या राजने दाक्षिणात्य चित्रपटही केला होता. ‘मद्रासी गँग’ या तेलुगू चित्रपटात तिने सरिता नावाची भूमिका साकारली होती, जी मुंबईतील झोपडपट्टीत राहणारी एक महिला आणि एका गँगस्टरची गर्लफ्रेंड असते. अजय अँड्र्यूज दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता अभिषेक पटेलने पोलिसाची तर अध्ययन सुमनने गँगस्टरची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर अनन्या अनेक म्युझिक व्हिडीओंमध्येही झळकली होती. तिने टी-सीरिज, जी म्युझिक आणि टाइम्स म्युझिक यांसारख्या मोठ्या म्युझिक लेबल्सबरोबर काम केलं होतं.
