अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. मागच्या आठवड्यात तिने जेन झीला गटर जनरेशन असं म्हटलं होतं. त्यामुळे तिच्यावर बरीच टीकाही झाली होती. भाजपाच्या खासदार पदावर असलेल्या कंगनाने आता एक नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. होय मला संघी व्हायचं आहे कुणाला काय आक्षेप आहे? सांगा असा थेट सवाल कंगनाने केला आहे. संसदेत जाण्यापूर्वी कंगनाने व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय म्हटलं आहे कंगनाने व्हिडीओमध्ये?
कथित डाव्या विचारांचे लोक आणि समाजाचे ठेकेदार म्हणवणाऱ्या लोकांवर कंगनाने टीका केली आहे. कंगना म्हणाली हिंदू मुलींची बदलती मानसिकता आणि वैचारिक स्वातंत्र्य यावर कधीही गंभीर प्रश्न उपस्थित करु नका. कंगनाने म्हटलंय काही सिनेमाच्या क्षेत्रात माझ्या काही बहिणी आहेत त्यांना कुठलीही विचारधाराच नाही. धर्माच्या बाबतीत त्यांची काही विचारधारा नाही किंवा राजकारणाच्या बाबतीतही त्यांचं काही मत नाही. पण कुणाशी प्रेमसंबंध ठेवणं असो, लग्न करणं असो किंवा अगदी मैत्री करणं असो त्या लगेच इस्लामच्या संपर्कात येतात. कट्टर डाव्या विचारांच्या होतात. हरकत नाही, संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे. ज्याला जे वाटतंय ते प्रत्येकजण करु शकतो. पण मग याच माझ्या बहिणी सिलेक्टिव्ह का होतात? या सगळ्यांना मी जवळून पाहिलं आहे. असं कंगनाने म्हटलं आहे.
होय मला संघी व्हायचं आहे, कुणाला काय आक्षेप आहे?
कंगना पुढे म्हणाली, संविधानाने आपल्याला सगळ्यांना कसा विचार करायचा, कुठली विचारधारा मान्य करायची हे निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. पण मग जेव्हा हिंदू मुलींची बाब येते तेव्हा अचानक सगळं बदलून कसं जातं? मी स्वतःचा बचाव करणार नाही. मी आयटम नंबर्सबाबत बोलले, घराणेशाहीबाबत बोलले, हिरोंच्या विरोधात भूमिका घेतली. होय मी तेव्हा मॉडरेट हिंदू होते. आता मी जर विचारधारा बदलली आहे तर अचानक सगळ्यांना त्रास का होतो आहे? होय मी मॉडरेट हिंदू होती. मला विचारलं जातं तू कधीपासून संघी झालीस? मी सांगते होय मला संघी व्हायचं आहे, मला भाजपाची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मान्य आहे. मला हा बदल स्वतःमध्ये घडवायचा आहे. मी का कनव्हर्ट होऊ शकत नाही. मी काही मत मांडलं तर लगेच समाजाचे कथित ठेकेदार विचारतात तू पार्टी करायचीस, तू अमुक करायची तू तमुक करायचीस म्हणतात. हो मी करायचे पार्टी, सगळं करायचं. पण आता मला संघी व्हायचं आहे एक जागरुक हिंदू व्हायचं आहे. माझ्यासाठी तो मार्ग का बरं बंद आहे? दुटप्पी विचार मला मान्य नाही, तसं करणारे लोकही मला पटत नाहीत. माझे विचार आणखी कसे सुधारतील तुम्ही सांगा. मला आवडेल, शिवाय माझं हिंदू मुलींनाही हे सांगणं आहे तुम्हालाही अशा पद्धतीने बदल करायचा असेल तर तो तुम्ही जरुर करा.
कंगनाचा व्हिडीओ चर्चेत
कंगनाने हा व्हिडीओ आज सकाळी पोस्ट केला आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तिचं अभिनंदनही केलं आहे.
