Bhagyashree House Inside Photos: ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्री खऱ्या आयुष्यात सांगलीच्या राजघराण्यातील राजकुमारी आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ती मुंबईत स्थायिक झाली असली, तरी तिच्या घरात राजेशाही थाटाची झलक पाहायला मिळते. तिचे मुंबईतील घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. तिच्या घरात पारंपरिक भव्यता आणि आधुनिक लक्झरी यांचा सुंदर मेळ दिसतो. या घराचं वैशिष्ट्य म्हणजे झाडावर नैसर्गिकरित्या तयार झालेली गणपतीची आकृती आहे. भाग्यश्रीच्या मते, याच गोष्टीमुळे तिने आणि तिचे पती हिमालय दासानी यांनी हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला होता.

फराह खानने शेअर केलेल्या व्लॉगमध्ये भाग्यश्रीच्या घराची झलक पाहायला मिळते. हिरवळीने वेढलेल्या भव्य रस्त्याने घराच्या पार्किंगकडे रस्ता जातो. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंनी नक्षीकाम असलेला एक आकर्षक काळा दरवाजा आहे. मुख्य दरवाज्यातून आत आल्यावर एक सुंदर फॉयर आहे. तिथे नक्षीदार पांढरी भिंत आणि चांदीचा हत्ती असलेली शोपीस टेबल आहे. लिव्हिंग रूममध्ये तपकिरी रंगाचे मऊ सोफे आणि पांढऱ्या उशांची सजावट आहे, ज्यामुळे घराला एक उबदार व आलिशान लुक मिळतो.

डायनिंग टेबल अन् चांदीची भांडी

डायनिंग रूममध्ये ऑफ-व्हाइट डायनिंग टेबल आणि त्यावर चांदीची भांडी सजवली आहेत. मित्रांबरोबर गप्पा मारण्यासाठी आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास वेगळा सिटिंग एरिया आहे. एका कोपऱ्यात लाकडी भिंतीसमोर हिरव्या रंगाचा मखमली सोफा आहे. त्याचबरोबर फुलझाडांनी खास सजावट केली आहे.

bhagyashree-mumbai-house-inside-photos
भाग्यश्रीच्या घरातील झलक (फोटो- फराह खान युट्यूब)

निसर्गनिर्मित गणपतीमुळे घेतले घर

या घराचे सर्वात खास आणि भावनिक वैशिष्ट्य म्हणजे घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका झाडाच्या बुंध्यावर नैसर्गिकरित्या तयार झालेली श्रीगणेशाची आकृती आहे. फराह खानशी बोलताना भाग्यश्री म्हणाली, “आम्ही हे घर फक्त या गणपतीच्या आकृतीमुळेच खरेदी केले.” या झाडाच्या बुंध्याला डोळे आणि सोंडेसारखा नैसर्गिक आकार आहे, तर भाग्यश्रीचे पती हिमालय दासानी यांनी नंतर त्याला अधिक स्पष्ट रूप देण्यासाठी थोडे बदल केले. भाग्यश्रीने घर खरेदी केलं तेव्हा ते खूप वेगळं होतं. भाग्यश्री आणि तिच्या पतीने घराच्या सर्व भिंती पाडून त्याचं नूतनीकरण केलं.

bhagyashree-mumbai-house-inside-photos
हेच ते झाड, ज्यामुळे भाग्यश्रीने हे घर घेतलं. (फोटो- फराह खान युट्यूब)

भाग्यश्रीच्या घराची मुख्य वैशिष्ट्ये –

खासगी मंदिर आणि टेरेस: मागच्या बाजूच्या काळ्या पायऱ्या थेट भाग्यश्रीच्या मंदिराकडे जातात. वरच्या मजल्यावर मंदिर, टेरेस आणि एक बेडरूम आहे.

पार्टीसाठी आउटडोअर जागा: घराबाहेरील मोकळी जागा सण आणि पार्ट्यांसाठी वापरली जाते. इथे सुंदर रोषणाई, झुंबर, फुलांची सजावट आणि मोठी झाडे आहेत. मुंबईत एवढं मोठं घर असायला नशीब लागतं, असं फराह भाग्यश्रीचं घर पाहून म्हणाली.

bhagyashree-mumbai-house-inside-photos(1)
भाग्यश्रीच्या घराची झलक (फोटो- फराह खान युट्यूब)

ऑल-व्हाइट किचन: संपूर्ण घरात वेगवेगळ्या रंगांची थीम असली तरी, स्वयंपाकघर मात्र पूर्णपणे पांढऱ्या रंगात डिझाइन केले आहे. मुंबईसारख्या शहरात या किचनमध्ये भरपूर मोकळी जागा, उजेड, खेळती हवा आहे. घरातून बाहेरचा छान लूकही पाहायला मिळतो.

फोटोंसाठी खास भिंत व योग एरिया: घरात एका भिंतीवर संपूर्ण कुटुंबाचे खास फोटो लावले आहेत. याशिवाय, वर्कआउट आणि योगासाठी स्वतंत्र मोकळी जागा आहे, जिथे मार्बल फ्लोअरिंग, लाकडी भिंत आणि लाल रंगाचा सोफा आहे.

थोडक्यात सांगायचं झाल्यास, भाग्यश्रीचे हे मुंबईतील घर तिच्या राजेशाही कौटुंबिक वारशाचीच एक सुंदर झलक दाखवते.