१९७० च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांची ‘बनारसी बाबू’ स्टाइल असलेल्या भूमिका केल्या होत्या. ‘खईके पान बनारस वाला’ हे त्यांचं लोकप्रिय गाणं प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. पण एकदा खऱ्या आयुष्यात मात्र अभिनेत्री पान खाऊन थुंकली आणि ते थेट अमिताभ बच्चन यांच्या अंगावर उडालं होतं. यानंतर अभिनेत्रीला ओशाळल्यासारखं झालं आणि आपण अनेकदा त्यांची माफी मागितली असं सांगितलं.

विकी लालवानी यांच्याशी बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू यांनी हा किस्सा सांगितला. ही घटना घडली तेव्हा ते ऋषिकेशमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत होतं. संध्याकाळी जेवणासाठी संपूर्ण टीम एकत्र डेहराडूनला गेली होती. तिथून परत येत असताना बिंदू गाडीत बसून पान खात होत्या, तर अमिताभ बच्चन मागच्या सीटवर बसले होते.

नेमका किस्सा काय?

आठवण सांगत बिंदू म्हणाल्या, “मला अजूनही आठवतंय, परत येताना मी पान खाल्लं होते. गाडीच्या सर्व खिडक्या उघड्या होत्या आणि मी जिथे बसले होते, तिथे माझ्या चेहऱ्यावर थेट वारा येत होता. पान थुंकण्यासाठी मी माझं डोकं खिडकीबाहेर काढलं, पण मी थुंकताच वाऱ्यामुळे सर्व थेट अमिताभ यांच्या शर्टवर उडालं. मला इतकी लाज वाटली की मी त्यांची वारंवार माफी मागू लागले.” अमिताभ यांना या गोष्टीचा अजिबात राग आला नाही आणि त्यांनी ‘काही हरकत नाही’ असं म्हटलं. पण त्यानंतर पुढचे बरेच दिवस त्यांनी बिंदू यांची फिरकी घेतली.

actress bindu
अभिनेत्री बिंदू

अमिताभ बच्चन आणि बिंदू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण त्यांचा ‘अभिमान’ चित्रपट खूप गाजला होता. या सिनेमात अमिताभ आणि जया होते. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलेले असताना त्यांनी अमिताभ यांच्या पात्राच्या एका जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. बिंदू यांनी त्यांच्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. पण या चित्रपटात मात्र त्यांनी वेगळी भूमिका केली होती.

बिंदू बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. त्या शेवटच्या २००८ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसल्या होत्या. त्यांनी फराह खानच्या ‘मै हूं ना’ चित्रपटात काम केलं होतं, त्यात त्यांनी एका हिंदी प्रोफेसरची भूमिका साकारली होती. १९७० आणि १९८० च्या दशकातील ‘शान’, ‘कटी पतंग’, ‘दो रास्ते’ यांसारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी बिंदू ओळखल्या जातात.