अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली हिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. सेलिनाने तिचा ऑस्ट्रियन पती पीटर हाग याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. तिने यासंदर्भात मदतीसाठी मुंबईतील न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी पीटरला नोटीस बजावली आहे. १२ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
‘नो एंट्री’ आणि ‘गोलमाल रिटर्न्स’ सारख्या हिंदी चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिना जेटलीने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. पती पीटर हागने भावनिक, शारीरिक आणि आर्थिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. हागने तिला मध्यरात्री ऑस्ट्रियातील घर सोडण्यास भाग पाडलं. सेलिना ११ ऑक्टोबर रोजी तिच्या तीन मुलांना सोडून भारतात परतली. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.
पीटर हाग तिन्ही मुलांना भेटू देत नसल्याचा आरोपही सेलिनाने केला. १४ नोव्हेंबर रोजी एकदाच त्याने मुलांशी बोलू दिलं. मुलांशी फोनवर संपर्क साधता यावा, यासाठी तिने कोर्टात मदत मागितली आहे. धक्कादायक बाब अशी की सेलिनाने याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, पीटरने ऑस्ट्रियामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. सेलिना व पीटर यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रियन नागरी कायद्यानुसार लग्नाची नोंदणी केली होती.
सेलिना जेटलीने मागितली नुकसान भरपाई
सेलिना जेटलीने याचिकेत पीटरकडून दर महिन्याला १० लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. तसेच त्याने केलेल्या गैरवर्तनामुळे नुकसान झालंय, ते ५० कोटी आणि इतर ५० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. त्याचबरोबर पीटरने दोघांच्या मालकीचा मुंबईतील अंधेरी येथील फ्लॅटचा ताबा तिला द्यावा आणि त्याला तिथे येण्यापासून रोखावं अशी मागणीही केली आहे. त्याने मुंबई आणि व्हिएन्नामधील मालमत्तेत त्याच्यामुळे झालेल्या नुकसानाची १.२६ कोटी रुपये आणि पैशांच्या गैरवापरासंदर्भात आणखी ३२ लाख रुपये मागितले आहेत.
सेलिना जेटलीने लॉ फर्म करंजावाला अँड कंपनी मार्फत ही याचिका दाखल केली आहे. सेलिना जेटली ४७ वर्षांची आहे. तर पीटर हाग ४८ वर्षांचा आहे. या दोघांची पहिली भेट दुबईमध्ये मित्रांच्या माध्यमातून झाली होती. थोडा वेळ एकत्र घालवल्यानंतर सप्टेंबर २०१० मध्ये मुंबईत हिंदू पद्धतीने त्यांनी लग्न केले आणि त्याच महिन्यात ऑस्ट्रियामध्ये त्यांनी लग्नाची नोंदणी केली होती. लग्नात पीटरने महागड्या वस्तूंची मागणी केली होती, त्याला लाखो रुपयांच्या वस्तू देण्यात आल्या होत्या, असा आरोपही सेलिनाने केला आहे.
दरम्यान, सेलिना जेटलीला २०१२ मध्ये जुळी मुलं झाली. नंतर २०१७ मध्ये पुन्हा तिला जुळी मुलं झाली. त्यापैकी एका मुलाचं निधन झालं. आता सेलिनाने पती तिन्ही मुलांना भेटू देत नसल्याचा आरोप केला आहे.
