बॉलीवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खानचा इंडस्ट्रीत खूप मोठा चाहतावर्ग आहे. डेझी शाह, शहनाज गिल, झरीन खान अशा अनेक नवोदित अभिनेत्रींचं सलमानमुळे नशीब उजळलं. भाईजानच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अनेक मोठमोठे कलाकार कॅमेऱ्यासमोर एक अन् पडद्यामागे वेगळीच बाजू दाखवतात असं अनेकांचं म्हणणं असतं. पण, सलमानचं असं नाहीये. खऱ्या आयुष्यात सुद्धा सलमान तितकीच छान मैत्री जपतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्त्रियांप्रती प्रचंड आदर आहे.

कोणत्याही महिलेला सिनेमात शोभेची बाहुली म्हणून दाखवू नये असं सलमानचं ठाम मत आहे, असा खुलासा अभिनेत्री डेझी शाहने हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत केला. अभिनेत्री डेझी शाहने भाईजानबरोबर ‘जय हो’ सिनेमात काम केलं होतं. २०१४ मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यावेळी एका सीनदरम्यान डेझीचा ड्रेस सलमानला खूपच शॉर्ट वाटला होता. त्यावेळी सलमानने तिला अंगावर ब्लँकेट ओढून शूट करण्यास सांगितलं होतं.

सलमान खान स्त्रियांचा कशाप्रकारे आदर करतो याबाबत डेझी शाहने भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “तुमच्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये किंवा सिनेमात महिलांना केवळ शोभेची बाहुली किंवा शोभेची वस्तू म्हणून दाखवू नका हे त्यांचं ठाम मत असतं. अनेकदा आकर्षणासाठी महिलांना शॉर्ट कपडे दिले जातात पण, सलमानचं असं नाहीये. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अंगप्रदर्शन नसतं…स्त्रियांना जेवढे व्यवस्थित, शोभनीय कपडे द्याल तेवढ्या त्या अधिक सुंदर दिसतील.”

“मला अजूनही आठवतंय आम्ही ‘जय हो’ सिनेमाचं शूटिंग हैदराबाद रामोजी फिल्म सिटीमध्ये करत होतो. त्या सीनमध्ये मला एक आऊटफिट देण्यात आला होता…त्यात सकाळचा ‘तुमको तो आना ही था’ गाण्यातील एक सीन आहे…ज्यात मी सकाळी झोपेतून उठते आणि नंतर वृत्तपत्र वगैरे घेते असा एकंदर सीन आहे. त्यावेळी माझा ड्रेस सलमानला थोडा विचित्र वाटला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, अंगावर ब्लँकेट ओढून घे..मग तुम्ही आता त्या गाण्यात पाहू शकता की, त्या ड्रेसवर मी पुन्हा ब्लँकेट घेतलंय. ही ब्लँकेटची कल्पना सलमान खानची होती. कारण, तो नाईट ड्रेस फारच शॉर्ट होता.”

salman khan daisy shah
डेझी शाहने गाण्यात अशाप्रकारे ब्लँकेट ओढून घेतलं होतं

दरम्यान, डेझी शाहने ‘जय हो’ नंतर ‘हेट स्टोरीज ३’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. डेझी अभिनयासह उत्तम कोरिओग्राफर व डान्सर म्हणून देखील ओळखली जाते. तिने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात २०१० मध्ये तामिळ सिनेमातून केली होती.