Daisy Shah alcoholic fans experience : डेझी शाह ही बॉलीवूडमधील ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ‘जय हो’ या चित्रपटातून सलमान खानसह स्क्रीन शेअर करत तिने लोकप्रियता मिळवली. सिनेविश्वात यश आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेक गोष्टी संयमाने हाताळाव्या लागतात, असे सांगत डेझी शाहने तिचे काही अनुभव शेअर केले. तसेच गर्दीमध्ये घडलेल्या एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाची तिने आठवण सांगितली.

डेझी शाहने ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचा असिस्टंट डान्सर ते लोकप्रिय अभिनेत्री होण्यापर्यंत झालेला प्रवास सांगितला. यावेळी सुरुवातीला सिनेविश्वामध्ये काम करू देण्यासाठी वडील तयार नव्हते, मात्र नंतर आईने त्यांना समजावले. आजही तिने कमावलेले पैसे ती आईकडे देत असल्याचे डेझीने सांगितले. बॉलीवूडबाबत ती म्हणाली की, सिनेविश्वाबद्दल अनेक गैरसमज निर्माण झालेले असतात, मात्र प्रत्यक्षात असे काही नसते. तुम्हाला काम करताना अनेक चांगली माणसं भेटतात. मुलींसाठी हे क्षेत्र सुरक्षित नाही असे म्हटले जाते, मात्र असे काही नाही. सगळं आपल्यावर अवलंबून असतं, असे मत अभिनेत्री डेझी शाहने व्यक्त केले.

लोकप्रियता म्हणजे नाण्याच्या दोन बाजू

लोकप्रियता मिळाल्यानंतर अनेक वेगवेगळे अनुभव येतात. डेझी शाह म्हणाली की, जशी तुम्ही लोकप्रियता मिळवता तशा तुमच्यावर लोकांच्या नजरा असतात. अनेकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते, अशावेळी तुम्हाला संयम दाखवावा लागतो. लोकप्रियता म्हणजे नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मत डेझी शाहने व्यक्त केले. पुढे डेझीने चाहत्यांबाबत अनुभव सांगितला.

चाहत्यांना फोटो मिळाला नाही तर टीका करतात – डेझी

चाहत्यांना फोटो न दिल्याबद्दल ते नाराज होतात आणि नंतर सोशल मीडियावर कमेंट करून टीका करीत असल्याचे डेझीने सांगितले. ती म्हणाली, चाहत्यांना फोटो घ्यायचे असतात हे मी समजू शकते, मी पण आधी सेलिब्रिटी लोकांसह फोटो घेत होते. आता जेव्हा लोकं माझ्यासोबत फोटो घेण्यासाठी येतात तेव्हा चांगलं वाटतं. पण, अनेकदा गर्दीच्या ठिकाणी काही फॅन्सला फोटो द्यायचा राहून जातो. ३-४ हजार लोकांची गर्दी असल्यानंतर आपण सरळ निघून जातो आणि गर्दीतून लोक फोटो मागत आहेत हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. पण, त्यामुळे फोटो द्यायचाच नाही असं नाही. जास्त गर्दी असेल तर काहींना फोटो द्यायचे राहतात, अशी खंत डेझी शाहने व्यक्त केली आहे.

मद्यपान केलेले चाहते भेटले अन्…

पुढे डेझीने सांगितले की, “एकदा मी एका कार्यक्रमाला गेले होते आणि तेव्हा माझ्या अगदी जवळच दोन-तीन लोक उभे होते. त्यांनी मद्यपान केल्याचा उग्र वास येत होता. त्यांनी मद्यपान केल्याचे मला स्पष्टपणे जाणवत होते. त्यावेळी मला त्या व्यक्तीशी कोणताही संवाद करू नये असे मनापासून वाटत होते. पण, अशा वेळी संयम दाखवावा लागतो. तुम्ही त्यांच्याशी उद्धटपणे वागू शकत नाही, कारण आजूबाजूला बाकीची लोकसुद्धा असतात. पण, हा आपल्या कामातील एक अनुभव असतो. याचे आपण काहीच करू शकत नाही, असे देखील मत अभिनेत्री डेझी शाहने व्यक्त केले.