Dia Mirza Tumsa Nahin Dekha Song Shooting : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या २५ वर्षांच्या चित्रपट प्रवासातील एक महत्त्वाची आठवण शेअर केली आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटातील ‘मुझे तुमसे मोहब्बत है’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान तिला सेटवर ५०० ते १००० पुरुषांच्या उपस्थितीत तोकड्या कपड्यांमध्ये परफॉर्म करावे लागले होते. हैदराबादच्या पारंपारिक कुटुंबातून आलेल्या दियासाठी हा अनुभव मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होता.

‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत इमरान हाश्मीबरोबरच्या या रोमँटिक गाण्याच्या शूटिंगबद्दल ती म्हणाली, “या अनुभवाने मी खूप बदलले. ज्या आत्मविश्वासाने मी त्या गाण्यात परफॉर्म केलं, त्याचे सगळे श्रेय कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि तिच्या टीमला जातं. त्यांनी मला सुरक्षित वाटेल, याची काळजी घेतली. पण एक मुलगी म्हणून मी केलेल्या सर्वात कठीण गोष्टींपैकी ही एक होती. कारण सेटवर शेकडो पुरुषांच्या उपस्थितीत मला मोजक्या कपड्यांमध्ये शूटिंग करावं लागलं होतं.”

रूममध्ये ५०० लोक आहेत की १०००, काय म्हणाली दिया मिर्झा?

दिया मिर्झा पुढे म्हणाली, “शूटिंग सुरू होईपर्यंत एका कलाकाराने पात्राचा मूळ आत्मा कसा शोधावा आणि त्या पात्राद्वारे काय व्यक्त करायचंय, याचं महत्त्व मला समजलं होतं. त्यामुळे रूममध्ये ५०० लोक आहेत की १०००, त्याने मला काहीही फरक पडत नव्हता.” हा चित्रपट हॉलीवूडच्या ‘प्रीटी वमन’ या क्लासिक चित्रपटावरून प्रेरित होता, यात इमरान हाश्मी श्रीमंत मुलगा असतो, जो बार डान्सरच्या भूमिकेत असलेल्या दियाच्या प्रेमात पडतो.

या अनुभवामुळे आपला अभिनय खूप सुधारला असं दियाला वाटतं. “माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील अशा अनेक गोष्टींनी मला आज एक कलाकार म्हणून घडवलंय. २५ वर्षांच्या या प्रवासात मी माझ्या मनातील भीतीवर मात करू शकले, म्हणूनच आज मी माझ्या भूमिकेत जिवंतपणा आणि बारकावे आणू शकते. शिकणं एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मी अशीच शिकत राहीन आणि स्वतःत सुधारणा करत राहीन,” असं दिया मिर्झा म्हणाली.

dia-mirza-opens-up-about-tumsa-nahin-dekha-song-shooting-experience
अभिनेत्री दिया मिर्झा (फोटो- इन्स्टाग्राम)

पूर्वीचे आणि आताचे बोल्ड सीन्स

पूर्वीच्या आणि आजच्या काळातील बोल्ड भूमिका व दृश्यांबद्दल दिया मिर्झा म्हणाली, “आधी मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये अशा भूमिका फारशा लिहिल्या जात नव्हत्या. ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट प्रिटी वूमनपासून प्रेरित होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने शूट करण्यात आला होता. त्या चित्रपटात काम करणं खूप रंजक होतं.”

“मी हैदराबादच्या एका अत्यंत पारंपरिक कुटुंबातून आलेली मुलगी होते. मला माझ्या शरीराबद्दल अजिबात आत्मविश्वास नव्हता. पण त्या चित्रपटात काम करताना माझ्या मनातील भीती दूर झाली. ‘मुझे तुमसे मोहब्बत है’ या एका गाण्याने माझ्या मनातील सर्व बंधनं तोडून मला माझ्या शरीराबद्दल खऱ्या अर्थाने आत्मविश्वास दिला,” असं दिया मिर्झाने नमूद केलं.

दिया मिर्झा नुकतीच नेटफ्लिक्सच्या ‘ऑपरेशन सफेद सागर’ सीरिजमध्ये दिसली होती. यात जिमी शेरगिल आणि सिद्धार्थ यांच्यासह अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.