Eva Grover on Divorce: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री इव्हा ग्रोव्हरने आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खान याच्याशी ओळख झाल्यानंतर अवघ्या १९ दिवसांत पळून जाऊन लग्न केले. परंतु, लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी हैदरने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. हैदरला ‘स्कित्झोफ्रेनिया’ हा मानसिक आजार होता, ज्याची माहिती इव्हाला लग्नाआधी नव्हती. दारू पिणं, संशयी स्वभाव आणि अपयशामुळे त्याचा हिंसकपणा अधिक वाढत गेला. ५ वर्षे शारीरिक व मानसिक छळ सहन करूनही इव्हाने लग्न वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती बिघडत गेली आणि अखेर नातेवाईक व सहकलाकारांच्या मध्यस्थीने तिचा घटस्फोट झाला.
कौटुंबिक वादामुळे मुलगी ३ वर्षांची असतानाच तिची कस्टडी सासरच्या कुटुंबाकडे गेली, ज्यामुळे इव्हा पुढील १० वर्षे स्वतःच्या मुलीपासून दूर राहिली. तरीही इव्हाने मुलीच्या शिक्षणासाठी सगळा खर्च केला, पण तरीही ती तिला बरीच वर्षे भेटू शकली नव्हती. “मी पाच वर्षे शारीरिक छळ सहन केला. माझी मुलगी माझ्याबरोबर नव्हती. मी १० वर्षे तिला पाहिलं नव्हतं. मी तिच्या शिक्षणासाठी दरमहा पैसे पाठवत होते. ती आता १९ वर्षांची आहे आणि आठवड्यातून एक-दोनदा मला भेटायला येते. मी तिच्या वयाची होते, त्यापेक्षा ती खूप समजूतदार आहे,” असं इव्हाने सांगितलं.
इव्हा ग्रोव्हर आमिर खानबद्दल म्हणाली…
आमिरला माहीत होतं की तिला हैदरबरोबरच्या लग्नात त्रास होतोय, असा खुलासा इव्हाने केला. “आमिर सर म्हणाले होते की मी घेतलेला निर्णय चुकलाय. माझ्या लग्नाआधीच त्यांची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आली होती, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं.” इव्हाच्या मते, आमिर खान हैदरच्या कुटुंबापासून कायमच दूर राहिला. हैदर आणि त्याची बहीण हे ताहिर हुसैन यांची स्वतःची मुलं नव्हती, तर त्यांच्या दुसऱ्या पत्नी शेहनाज खान यांच्या पहिल्या लग्नापासून झालेली मुलं होती.
इव्हा ग्रोव्हरला आजही एक्स पतीबद्दल वाईट वाटतं
इव्हा ग्रोव्हरला इतका त्रास सहन करूनही एक्स पतीबद्दल वाईट वाटतं. हैदर सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत जगत असल्याचा खुलासा तिने केला. “आता हैदरची परिस्थिती चांगली नाही. त्याच्याकडे घर नाही आणि जेवणासाठीही तो संघर्ष करतोय. कधीकधी कोणीतरी त्याला चाळीत राहू देतं, तर कधीकधी एखादा मित्र त्याला मदत करतो. मला खूप वाईट वाटतं. जे झालं ते झालं, पण तो एकेकाळी माझा नवरा होता, त्यामुळे वाईट वाटतं. हैदरची संगत चुकीची आहे. लोक त्याला दारू पाजतात, त्याची कोळजी कोणीही घेत नाही, त्याने खूप त्रास सहन केलाय,” असं इव्हा ग्रोव्हर म्हणाली.
