Evelyn Sharma Tushan Bhindi Divorce: ‘ये जवानी है दिवानी’, ‘मै तेरा हिरो’ आणि ‘साहो’ सारख्या चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेली बॉलीवूड अभिनेत्री एव्हलिन शर्मा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एव्हलिन आणि तिचा पती तुषान भिंडी यांनी लग्नाच्या पाच वर्षांनंतर घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. एव्हलिनने हा निर्णय अत्यंत समंजसपणाने घेतल्याचे तिने सांगितले. २०१९ मध्ये सिडनी हार्बर ब्रिजवर झालेल्या रोमँटिक प्रपोजलपासून सुरू झालेला हा प्रवास आता एका वेगळ्या वळणावर येऊन थांबला आहे. जरी ते पती-पत्नी म्हणून वेगळे होत असले, तरी मुलांच्या संगोपनासाठी आणि मित्र म्हणून ते कायम एकत्र राहतील, असेही तिने स्पष्ट केले आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना एव्हलिनने तिच्या घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला. “हो, आम्ही जोडीदार म्हणून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे, पण आमच्या मुलांच्या संगोपनासाठी आम्ही एकत्र असू. या काळात आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. आम्ही घटस्फोटाचा हा निर्णय अतिशय समंजसपणाने घेतला आहे. आम्ही भविष्यात एकमेकांचे चांगले मित्र राहू. तसेच दोघेही मिळून मुलांचा सांभाळ एकत्र करू. आम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत,” असं एव्हलिन म्हणाली.

मित्रामुळे झालेली पहिली भेट

एव्हलिन आणि तुषान यांनी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये एका खासगी समारंभात लग्न केलं होतं. तुषान ऑस्ट्रेलियात सर्जन म्हणून काम करत आहे. २०१८ मध्ये एका कॉमन फ्रेंडने या दोघांची ‘ब्लाइंड डेट’वर पहिली भेट करून दिली. २०१९ मध्ये सिडनी हार्बर ब्रिजजवळ एका बोटीवर तुषानने एव्हलिनला लग्नासाठी मागणी घातली होती आणि त्यानंतर लवकरच त्यांचा साखरपुडा झाला होता.

एव्हलिन व तुषानला आहेत दोन अपत्ये

पुढे एव्हलिन व तुषान यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते. अगदी प्रपोजपासून ते इंगेजमेंट व लग्नाचे फोटो त्यांनी पोस्ट केले होते. लग्नानंतर लवकरच ते आई-बाबा देखील झाले. २०२० मध्ये त्यांनी ‘कोको’ नावाचा श्वान घरी आणला होता. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. तिचं नाव ‘अवा रानिया भिंडी’ असं आहे. तर २०२३ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा ‘आर्डन’चं स्वागत केलं.

एक्स पती गुजराती तर एव्हलिन जर्मन-पंजाबी

यापूर्वी ‘स्क्रीन’शी बोलताना एव्हलिनने तिच्या लग्नाबद्दल व पतीबरोबरच्या सांस्कृतिक फरकांबद्दल भाष्य केलं होतं. “माझे पती गुजराती आहेत, पण ते सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे राहतात. मी पंजाबी-जर्मन आहे, तरीही मला वाटतं की मी त्यांच्यापेक्षा जास्त भारतीय आहे, कारण मी १० वर्षे भारतात राहिले आहे. मी खूप प्रवास केल्यामुळे अनेक संस्कृती पाहिल्या आहेत. आमच्या लग्नात अशा विविध संस्कृतींचे मिश्रण आहे,” असं एव्हलिन म्हणाली होती.

एव्हलिन शर्माचे करिअर

एव्हलिन शर्माने अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात ‘नौटंकी साला’, ‘यारियां’, ‘मैं तेरा हीरो’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘जब हॅरी मेट सेजल’ यांचा समावेश आहे. ती शेवटची प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात दिसली होती.