काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता आहे. या महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर आता या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिकेत दिसणार हे समोर येऊ लागलं आहे.
‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करण्यामागची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलघडली जाणार आहे. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक असे अनेक कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील. तर आता एक व्हिडीओ शेअर करत गिरीजा ओक या चित्रपटामध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे तिने स्पष्ट केलं आहे.
गिरीजा ओक सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच तिच्या कामाबद्दलची माहिती चाहत्यांची शेअर करत असते. तर नुकतीच तिने ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटातील तिच्या भूमिकेची झलक एका व्हिडीओतून समोर आणली आहे. या चित्रपटामध्ये ती इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या विषाणूशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर नंदिता गुप्ता यांच्या भूमिकेत दिसेल.
हेही वाचा : “मी ऑनलाईन रमीची जाहिरात केली कारण…”, गिरीजा ओक स्पष्टच बोलली
या व्हिडीओमध्ये गिरीजाचा कधीही न पाहिलेला अंदाज चाहत्यांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या तिच्या व्हिडीओवर कमेंट करत तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतली तिची अनेक मित्रमंडळी तिला या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.